गृहमंत्र्याविरुद्ध धाडस दाखवणाऱ्या अ‍ॅड जयश्री पाटील नेमक्या आहेत तरी कोण?

0
539

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. देशमुखांच्या राजीनाम्याच्या पत्रात अ‍ॅड जयश्री पाटील (adv Jayashree Patil) यांचं नाव आहे. कारण पाटील यांच्याच याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने आदेश दिले आहेत, त्यामुळं जयश्री पाटील हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कोण आहेत या जयश्री पाटील (Who is adv Jayashree Patil) ज्यांचं नाव मराठा आरक्षण प्रकरणातही चर्चेत होतं?

मुंबई उच्च न्यायालायने अॅड जयश्री पाटील यांची याचिका दाखल करून घेताना म्हटले की, या प्रकरणात डायरेक्टर जनरल सीबीआय या प्रकरणात चौकशी करतील. त्याचवेळी कोर्टाकडून अॅड जयश्री पाटील यांचे कौतुकही केले. कोणीतरी एक शूर आहे ज्याने हिंमत दाखवली अशा शब्दात हायकोर्टाने त्यांचे कौतुक केले. एवढ्या १०० कोटींच्या प्रकरणात एक तरी शूर आहे जे समोर आले आहेत, असे मत कोर्टाने यावेळी व्यक्त केले.

कोण आहेत अ‍ॅड. जयश्री पाटील?

मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका जी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, त्या याचिकाकर्त्यांपैकी एक म्हणजे अॅड जयश्री पाटील होय. अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच्या मराठा आरक्षणविरोधातील याचिकाकर्त्या म्हणून त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे. जयश्री पाटील यांनीही सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध जाहीर केला आहे. याआधी जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या मानव हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून सात वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. तसेच मानव अधिकारांबाबत त्यांच्या नावे अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जयश्री पाटील या जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या कन्या आहेत. परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

जयश्री पाटील यांची कायदा विषयात डॉक्टरेट झाली आहे. गेल्या २२ वर्षापासून त्या मुंबई उच्च न्यायालयात अॅडवोकेट म्हणून कार्यरत आहेत. अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या त्या पत्नी होत. अॅड जयश्री पाटील आणि अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी मिळूनच मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.