कोरोना व्हायरस: महाराष्ट्रात अखेर कर्फ्यू जाहीर

0
766

(लोकांनी ऐकले असते तर ही वेळ आली नसती, नाइलाजाने निर्णय घ्यावा लागला)

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीची घोषणा केली आहे. राज्यात कलम 144 लागू झाल्यानंतरही लोकांनी त्याला फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे निदर्शनास आले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात सुद्धा अशीच परिस्थिती होती. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना घरात राहण्याचे आवाहन करावे लागले. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आता संचारबंदी घोषित केली. दरम्यान, या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळ्यात आले आहे. सोबतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरुच राहणार आहेत.

जिल्हाबंदी देखील लागू करण्यात आली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी बंदी लावण्यात आली आहे. अनावश्यक प्रवासाला ही बंदी असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा या सील करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे अजूनही कोरोनापासून सुरक्षित आहेत. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच राज्यातंर्गत सुरु असलेली विमान वाहतूकही बंद करावी, असे पत्र उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पाठवले आहे.दरम्यान, संचारबंदीच्या (Curfew) काळात जीवनावश्यक वस्तू, औषधांचे कारखाने आणि या सगळ्याची ने-आण करणाऱ्या व्यवस्था सुरु राहतील, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आता जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणली नाही तर जगभरात जसं करोनाचं थैमान माजलं आहे तसंच ते महाराष्ट्रातही माजेल. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतो आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सर्व प्रार्थनास्थळं बंद करण्यात आली आहेत. त्याठिकाणी फक्त पुजाऱ्यांना पुजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बस फक्त अत्यावश्यक सेवांसाठी वापरली जात आहे. टॅक्सी, रिक्षा आणि खासगी वाहनं सुध्दा बंद करण्यात आली आहेत. जर आवश्यकता असेल तर टॅक्सीमध्ये चालक अधिक २ आणि रिक्षामध्ये चालक अधिक १ अशी परवानगी देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारने केलेली संचारबंदी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आहे. सर्वांना सोबत घेऊन या संकटावर मात करुया, असे त्यांनी यावेळी सांगितले.

फक्त ह्या गोष्टी राहणार सुरु

  • जीवनावश्यक वस्तूंची दुकानं
  • शेती निगडीत औषधांची दुकानं सुरु राहणार
  • किराणाची दुकानं
  • मेडिकल्स
  • दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
  • दवाखाने, रुग्णालयं

राज्यात आता केवळ सार्वजनिक नाही तर खासगी कार प्रवासवर सुद्धा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात प्रवास करत असताना ड्रायव्हर आणि तीन व्यक्ती तर देशात प्रवास करत असताना ड्रायव्हर आधीक दोन व्यक्ती अशी बंधने असतील. त्यातही आवश्यक असल्यासच प्रवासाची परवानगी राहील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, देशात सर्व परदेशातून येणारे विमान उतरवण्यावर आधीच बंदी लागू करण्यात आली होती. आता पंतप्रधानांशी चर्चा करून महाराष्ट्रातील देशांतर्गत फ्लाइट आणि विमानतळे सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल असेही ते पुढे म्हणाले आहेत.