राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये अहमदनगर शहराच्या नामांतराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलं आहे. अहमदनगरचं नामांतर करावं अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. विविध पक्षाच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून याबाबत मागणी केली जात होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव अहमदनगरला देण्यात यावं, अशी मागणी केली जात होती. अखेर सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे करण्यास मान्यता दिली आहे. शहर आणि तालुक्याशिवाय मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्यात येणार आहेत.
पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेता आला. वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची इच्छा पूर्ण करता आली, याचा मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
अहमदनगर शहराची स्थापना २८ मे १४९० रोजी मलिक अहमद बादशहाने केली. मागील वर्षीच्या मे महिन्यात अहमदनगर शहराच्या स्थापनेला ५३३ वर्ष पूर्ण झाली आहे. मलिक अहमद निजामशहाच्या नावावरुनच अहमदनगर हे नाव पडले होते. जे आता बदलण्यात आले आहे. आता अहमदनगर या शहराचं नाव पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्यास आले आहे.