पंतप्रधान मोदी नाही करणार सोशल मीडियाला बाय बाय

0
299

सोशल मीडियावर सक्रीय असणारे आणि ट्विटरवर देशातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियाला बाय बाय करण्याचे संकेत दिले होते. यामुळे त्यांच्या चाहत्यांचा एकच गोंधळ उडाला. परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या सोशल मीडियाच्या ट्विट मागील सत्य जाहीर केलंय.

SheInspiresUs असा हॅशटॅग मोदींनी ट्विट केला आहे. ८ मार्च म्हणजेच रविवारी महिला दिनाच्या दिवशी आपली सगळी सोशल मीडिया अकाऊंट्स महिलांना हँडल करायला देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया सोडणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.

या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी नागरिकांना केलंय. यामुळे एका दिवसासाठी पंतप्रधानांचं सोशल मीडिया अकाऊंट हाताळण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.

यासाठी, जगाला प्रेरणा देणाऱ्या महिला किंवा तुमच्या आयुष्यात प्रेरणेचं स्थान राहिलेल्या महिलांचा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. सोबतच #SheInspiresUs हा हॅशटॅगही जोडायचा आहे. पंतप्रधान मोदींचे ट्विटरवर तब्बल ५३.३ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. तर फेसबुकवर त्यांना ४ कोटी ४७ लोक फॉलो करत आहेत. इन्स्टाग्रावरही त्यांच्या फॉलोवर्सचा आकडा हा ३५. २ दशलक्षच्या घरात आहे. या विविध सोशल मीडिया व्यासपीठाद्वारे ही प्रेरणादायी महिला आपल्या विचारांनी, कार्यानं जगभरातील लोकांना प्रेरित करणार आहे.