मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली अयोध्येत राममंदीर निर्मितीसाठी १ कोटी रुपयांची देणगी

0
364

महाविकास आघाडीला १०० दिवस पुर्ण झाल्या निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अयोध्येला भेट दिली. या ठिकाणी राम जन्मभूमी आणि हनुमानगडीचे दर्शन घेण्याचा कार्यक्रम होता. 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर त्यांनी योगी सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची विनंतीही केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात शरयू आरती आणि सभा रद्द करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यावरून भाजपाकडून सतत टीका होत असते. शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे सांगण्यात येते. मात्र हिंदुत्व आणि भाजपा वेगळा आहे. भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही. मी केवळ भाजपापासून दूर झालो, मात्र हिंदुत्वापासून नाही, असे म्हणत त्यांनी आपली हिंदुत्वाची भूमिकाही स्पष्ट केली. २०१८ मध्ये मी पहिल्यांदा इथं आलो होतो, त्यानंतर मी पुन्हा इथं येईल असं म्हटलं होतं. त्यामुळे आज पुन्हा अयोध्येत येणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.” जेव्हा-जेव्हा अयोध्येला येतो, तेव्हा मला बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी दिलेल्या योगदानाची आठवण येते.
शरयू नदीची आरती करावी अशी इच्छा होती. मात्र कोरोनामुळे ती करू शकत नाही याचं दुःख आहे. आरती करण्यासाठी मी पुन्हा अयोध्येत येईन आणि येत राहीन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.