हाताला बाय बाय करत कमळ स्वीकारले; ज्योतिरादित्य सिंधिया भाजपात

0
360

काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर अपेक्षित घटनेप्रमाणे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि कमळ हाती घेतले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, खासदार आणि मध्य प्रदेशचे प्रभारी विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. ज्योतिरादित्य यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केल्यानंतर ज्योतिरादित्य यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, कॉंग्रेस सोडताना दुःख होत आहे. मात्र, कॉंग्रेसमध्ये नव्या नेतृत्त्वाला मान्यता देत नाही त्यामुळे मन व्यथित असल्याची खंतदेखील त्यांनी बोलून दाखवली.

पक्ष प्रवेशानंतर बोलताना सिंधिया म्हणाले की, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी मला आपल्या भाजपच्या कुटुंबात घेऊन एक स्थान दिले. त्यांचे मी आभार माणतो. वास्तव न स्वीकारणे आणि नवीन नेतृत्त्वाला संधी न देणे हेच काम सध्याच्या काँग्रेस नेतृत्त्वाकडून केले जात आहे. या वातावरणात त्या पक्षात राहणे माझ्यासाठी अशक्य होते. मध्य प्रदेशात २०१८ मध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर आपली स्वप्ने पूर्ण होतील असे मला वाटले होते. पण १८ महिन्यांतच स्वप्न धुळीला मिळाली. मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना अजून संपूर्ण कर्जमाफी मिळालेली नाही. राज्यात तरुणांना रोजगार मिळत नाही. पण भ्रष्टाचाराचा उद्योग एकदम तेजीत सुरू आहे. वाळू उपशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत त्यांनी भाजपला मिळालेल्या जनादेशीविषयीही वक्तव्य केलं. मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उंचवलं आहे. भविष्यातील आव्हानांचा अंदाज घेत त्यांनी या आव्हानांचा सामना करण्याचीही तयारी दाखवली आहे, हेच सांगत भारताचं भविष्य सुरक्षित हाती असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.