राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; पण पुण्यातील सभा होणार

0
398

गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये केले आहे. प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग यांचा होता तीव्र विरोध आहे. उत्तर भारतीयांची माफी मागा आणि मगच अयोध्याला या अशी ब्रिजभूषण सिंग यांची अट आहे. मात्र आता प्रकृतीसंदर्भातील कारणामुळे तुर्तास राज यांचा हा दौरा रद्द करण्यात आलाय. याबाबत २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे भाष्य करतील भूमिका मांडतील असे संकेत राज यांनी ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये दिलेत.

राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानंतर त्यांनी अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर राज्यातून मनसे पदाधिकाऱ्यांकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली होती.

उत्तर भारतातून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच त्यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध आहे. “आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावं”, असं भाजप खासदार म्हणतात. तर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध केला होता.

राज यांनी ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित’ असं वाक्य असणारी पोस्ट ट्विटरवरुन केलीय. पुढे ‘महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलूच… रविवारी दिनांक २२ मे रोजी सकाळी १० वाजता गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे’ येथे असंही या पोस्टमध्ये म्हटलंय.