मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आज(सोमवार) गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआयला चौकशीचे आदेश दिले असून, १५ दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्याच्या गृहमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. अखेर याबाबत निर्णय झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
१९९० ला दिलीप वळसे पाटील हे पहिल्यांदाच काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते, यानंतर सात वेळेस ते आंबेगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले, म्हणून आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यात येत आहे. १९९० ला दिलीप वळसे पाटील हे पहिल्यांदाच काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते, यानंतर सात वेळेस ते आंबेगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले, म्हणून आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या कामागर आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याचा कार्यभार होता. महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. वळसे पाटील यांनी यापूर्वी विधानसभा अध्यक्षपद देखील भूषवले होते. त्या अनुभवाचा फायदा महाविकासआघाडीला झाला होता.
कौटुंबिक परिस्थिती आणि शिक्षण
दिलीप वळसे पाटील यांचं जन्मगाव आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेलं एक छोटं खेडेगाव. गावाचं नाव आहे निरगुडसर. वळसे पाटील यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. लहानपनापासूच त्यांना समाजकार्याची पार्श्वभूमी आहे. प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यांचे शिक्षण बीए (ऑनर्स ),पत्रकारितेतील पदविका, एल.एल.बी, एल.एल. एम. आहे.
राजकीय प्रवास
1983 पासून ते शरद सहकारी बँकेच्या संचालकपदी आहेत. 1990 पासून ते आजतागायत सलग 7 वेळा आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे कायमस्वरूपी प्रतिनिधित्व करत आहेत. विधिमंडळ सरचिटणीस पद त्यांनी भूषविले आहे. 1999 पासून उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री, 2001 पासून ऊर्जा खात्याचा कार्यभार, नोव्हेंबर 2004 पासून ऊर्जा मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री, तसेच डिसेंबर 2008 पर्यंत उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी त्यांनी पेलली आहे. 1990 मध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि मागील सलग 30 वर्षे ते आंबेगावचे आमदार म्हणून निवडून आले.
आमदार असताना उत्कृष्ट संसदपटू ठरण्याचा मान त्यांना मिळाला. तंत्रज्ञानाची नवी दालने खेड्यापाड्यापर्यंत पोहोचावी यासाठी नॉलेज कार्पोरेशन ही वळसे-पाटील यांच्या दूरदृष्टी ची देणगी आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणाला नवी दिशा देता याावी यासाठी त्यांनी नॅशनल सेंटर फॉर रूरल डेव्हलपमेंट या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली आणि आज एक आदर्श शैक्षणिक संस्था म्हणून या संस्थेने नावलौकिक कमविला आहे. ज्या संस्थेकडे आदराने पाहिले जाते त्या रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापककीय मंडळावर निवड झाल्यामुळे तिथेही सक्रिय योगदान देत आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ते ट्रस्टी आहेत.