हिवरे बाजार ग्रामपंचायतीवर पोपटराव पवार यांची सत्ता कायम; पाटोद्यामध्ये भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात

0
313

तीस वर्षानंतर निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या आदर्शगाव हिवरेबाजार इथं पोपटराव पवार यांच्या आदर्श गाव पॅनलचा विजय झालाय. सातच्या सात जागांवर आदर्श गाव पॅनलचे उमेदवार निवडून आलेत. त्यामुळे हिवरे बाजार ग्रामपंचायतीवर पोपटराव पवार यांची सत्ता अबाधित राहिली आहे. आगामी काळामध्ये गावातील शेती विकासाबरोबरच कृषी मालाचे मार्केटिंग आणि लघु उद्योग यांच्या विकास करण्याचा अजेंडा असल्याचा पोपट पवार म्हणालेत.

हिवरेबाजारमध्ये यावर्षी गेल्या 30 वर्षांची परंपरा खंडीत झाली होती. येथे 1989 पासून निवडणूक बिनविरोध होत आली आहे. यावेळी मात्र ती होऊ शकली नाही. हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांचा शब्द अंतिम मानला जात होता. त्यामुळे 7 सदस्यीय ग्रामपंचायत 1989 पासून बिनविरोध राहिली. पण यंदा ही परंपरा खंडीत झाली असून सातही जागांसाठी निवडणूक पार पडली. पण पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनलला विजय मिळाल्याने हिवरे बाजारमधील ग्रामस्थांनी पोपटराव यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. औरंगाबादच्या पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. तब्बल 25 वर्षांनी आदर्श गाव असलेल्या पाटोद्यात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे. पेरे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या कन्या अनुराधा पेरे- पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांचा पराभव झाला आहे.

पाटोद्या गावातील भास्कर पेरे-पाटील यांचं वर्चस्व संपुष्टात

महाराष्ट्रभरात गावाला ओळख देणारे विकास पुरुष भास्कर पेरे-पाटील यांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. भास्कर पेरे-पाटील यांचा तब्बल पंचवीस वर्ष एक हाती गावावर वर्चस्व होतं. मात्र यावर्षी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीपूर्वीच आठ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तर तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली, यात भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे उभ्या होत्या. त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे.

भास्कर पेरे-पाटील यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. अकरा सदस्य असलेल्या पाटोदा ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीपूर्वीच आठ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक पार पडली. तीन जागांपैकी एका जागेवर भास्कर पेरे-पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे-पाटील उभ्या होत्या. त्यांचा पराभव त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या दुर्गेश खोकड यांनी पराभव केला. दुर्गेश खोकड यांना २०४ मतं मिळाली तर अनुराधा पेरे-पाटील यांना १८४ मतं मिळाली आहेत.