शिंदे-फडणवीस सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव; विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

0
282

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी शिंदे गट आणि भाजपाने १६४ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली, तर तीन आमदार तटस्थ राहिले.

164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. गेले 10 दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

दरम्यान, आज शिंदे-फडणवीस सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागलं. दरम्यान, काल झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. नार्वेकर यांना 164 मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधातील राजन साळवी यांना 107 मतं मिळाली होती.

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

राज्यात शिंदेगट आणि भाजपचे सरकार आले असून विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी बाकावर राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष झाला आहे. यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची निवड करण्यात येईल याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून होते. विरोधी पक्षनेता पदाच्या शर्यंतीत अजित पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची नावेही होती. मात्र शेवटी सर्वांनी अजित पवार यांच्याच नावाला पसंती दिली होती. त्यानंतर विश्वासदर्शक ठराव मतदान झाल्यानंतर अध्यक्षांना अजित पवार हेच विरोधी पक्षेनेते असतील असे पत्र देण्यात आले होते. मात्र त्याची घोषणा आता करण्यात आली आहे.