ग्रामपंचायत निवडणूक निकाल: युवा पिढीची कमाल; ऋतुराज देशमुख हा 21 वर्षांचा उच्चशिक्षित उमेदवार विजयी

0
299

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर आलेलं आहेत. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकू शकतो असे ठाम मत नसले तरी काही ठिकाणी याला नक्कीच अपवाद ठरत आहे. याचे एक उदाहरण म्हणजे ग्रामंपचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही परिस्थिती बदलू शकते अशी आशा निर्माण करणारा ऋतुराज देशमुख या 21 वर्षांच्या उच्चशिक्षित उमेदवाराची चर्चा आहे.

घाटणे गावची निवडणूक तशी फार महत्त्वाची ठरण्याचं कारण नव्हतं, पण ऋतुराजने त्याकडे लक्ष वेधलं. ग्रामीण भागात उच्चशिक्षणासाठी शहरात गेलेली मुलं फारशी गावाकडे फिरकत नाहीत. ऋतुराज याला अपवाद ठरले. त्यांनी BSc पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि पुण्यात LLB साठी प्रवेश घेण्यास ते उत्सुक आहेत. पण 20-21 व्या वर्षीच त्यांनी गावच्या राजकारणात रस घ्यायला सुरुवात केली. “आम्हा तरुणांना राजकारणापेक्षा गावच्या विकासात जास्त इंटरेस्ट आहे. जुन्या मंडळींना खुर्ची धरून ठेवण्यात रस जास्त आहे. आमचं तसं नाही”, ऋतुराज सांगतात.

त्यांनी 2021 च्या या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतःचं पॅनेल उभं केलं. त्यांच्या पॅनेलचे 7 पैकी 5 उमेदवार निवडून आले आहेत. निवडून आल्यावर काय करणार याचा जाहीरनामा ऋतुराज देशमुख यांनी कागदावर दिला होता. त्यात गावच्या महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी योजनांची माहिती होती. संपूर्ण राज्यातलं पहिलं सोलर गाव अशी ओळख घाटणे गावाला मिळावी यासाठीचा प्लॅनसुद्धा ऋतुराज यांनी आधीच दिला होता.

  • ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ऋतुराजनं गाव विकासाचा तयार केलेला जाहीरनामा सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरला होता.
  • आपलं पॅनेल निवडून आल्यास गावासाठी काय काय उपक्रम राबवणार, याची सविस्तर माहिती त्यानं या जाहीरनाम्यात दिली होती.
  • याविषयी विचारल्यावर तो म्हणाला, “सगळ्यांपर्यंत कमी वेळात पोहोचण्यासाठी मला सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला. मी काय करणार ते जाहीरनाम्यात लिहिलं आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचवलं. याचाच फायदा मला निवडणुकीत झाला.”