नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा;विधानसभा अध्यक्षपदी आता कोण ?

0
636

अखेर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव अंतिम झाल्याने नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नाना पटोले यांनी काँग्रेसपासून राजकारणाची सुरुवात केली. पण नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून त्यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पण पाच वर्षाच्या आताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत पुन्हा त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. २०१९ साली पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली व महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत चर्चा सुरु होती. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही पद सोडण्याची तयारी जाहीररित्या बोलून दाखवली होती. दरम्यान, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपण राजीनामा दिल्याचं सांगितलं. तसंच आपल्याला अद्याप नव्या जबाबदारीबाबत कळवण्यात आलेली नाही. मला फक्त विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश हायकमांकडून आले होते. त्याचं मी पालन केलं, असं पटोले म्हणाले. नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही.

नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यास विधानसभा अध्यक्ष कोण?
काँग्रेस पक्षाला देशासह राज्यातील नेतृत्वावरुन सध्या मोठ्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्रात देखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी खलबतं होताना दिसत आहेत. या सगळ्या चर्चेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. जर नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्ष पदासाठी कोण? हा सवाल उपस्थित होत आहे. जर पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.