ED कार्यालयासमोर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ म्हणून शिवसैनिकांची बॅनरबाजी

0
307

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचनालयाच्या कार्यालयासमोरच ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असे बॅनर लावले. त्यामुळे आगामी काळात भाजप विरुद्ध शिवसेना लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

एकीकडे संजय राऊतांची पत्रकार परिषद सुरू असताना शिवसैनिकांनी मुंबईतल्या ईडी कार्यालयाबाहेर बॅनरबाजी केली… ईडी कार्यालयाबाहेर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असं पोस्टर लावून शिवसेनेनं कृतीतून भाजप तसंच ईडीला टोला हाणला आहे.

शिवसैनिकांनी हा बॅनर लावल्याचे लक्षात आल्यानंतर काही पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहचले. मात्र तुम्हाला हा बॅनर काढता येणार नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेला तक्रार करा असं शिवसैनिकांनी पोलिसांनी सांगितलं. यासंदर्भातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करण्यात आलेले आहेत. पोलिसांनी नंतर हा बॅनर खाली उतरवला.

ईडीच्या माध्यमातून दबाव आणून सरकार पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी आज केला. गेल्या वर्षभरापासून आपल्यावर सरकार पाडण्यासाठी सातत्याने आपल्याला धमकावलं जात असल्याचा’ गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

‘ईडीच्या कार्यालयात गेल्या ३ महिन्यांपासून भाजपचे काही नेते सतत जात आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या २२ आमदारांची यादी आपल्याला दाखवण्यात आली. या २२ जणांना नोटीसा पाठवून नंतर अटकेची टांगती तलवार ठेऊन राजीनामे घेण्याचा कट रचला जात आहे.’ असा आरोप त्यांनी केला आहे.

कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, आम्ही लॉ मेकर आहोत, मी जर तोंड उघडलं तर केंद्रात हादरे बसतील, तुमची संपत्तीचे आकडे माझ्याकडे, तुमच्या मुलांचे हिशेब माझ्याकडे, मात्र उद्धव साहेबांचा आदेश, बाळासाहेबांची शिकवण, कुटुंबापर्यंत पोहोचायचं नाही, लढाई समोरासमोर करायची. ईडीच्या नोटीचा आदर करतो, भले तो भाजपचा पोपट असो, असा टोलाही राऊतांनी लगावला.