उत्तर प्रदेशात फिल्म सिटी: तुम्ही मोठं व्हा आणि मोठा विचार करा, योगी आदित्यनाथांचा संजय राऊतांना टोला

0
283

मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर मुंबई दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज याची अधिकृत घोषणा केली. सिनेसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांच्या भेटीनंतर योगींनी ही घोषणा केली. यावेळी ठाकरे सरकार आणि शिवसेनेकडून झालेल्या टीकेवरही योगींनी उत्तर दिलं. मुंबईची मायानगरी अर्थात फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेणार या चर्चेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेणार नसून नव्यानं उभारणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. ‘तुम्ही मोठे व्हा आणि मोठा विचार करा’, या शब्दात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर तोफ दागली आहे.

बॉलिवूडची फिल्मसिटी मुंबईतच राहणार आहे, असं उत्तर योगी आदित्यनाथ यांनी संजय राऊतांना दिलं आहे. काहीही हिसकावून घेणार नाही, ही तर खुली स्पर्धा, असा हल्लाबोल योगींनी शिवसेनेवर केला आहे. मुळात फिल्मसिटी ही काही वस्तू नाही. आम्ही नव्याने गोष्ट निर्माण करणार आहोत. ज्यांना योग्य वाटत असेल ते नक्की यात सहभागी होतील. तुम्हाला मोठं व्हावं लागणार आहे. मोठा विचार करावा लागणार आहे’, असा टोलाही योगी आदित्यनाथ यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले,” उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधिकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहिलं. आशियातील सर्वात मोठं विमानतळ असलेल्या जेवर विमानतळाजवळील १ हजार हेक्टरपेक्षा अधिक जागेवर ही फिल्म सिटी उभी करणार आहोत. या ठिकाणाहून उत्तर प्रदेशसह आणि देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणांची सर्व साधनं असतील. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही यासाठी रस दाखवला आहे. त्यासाठी त्यांचं अभिनंदन,” अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.

कुणी कुणाची काही वस्तू घेऊन जात नाही. मुळात हे काही कुणाची पर्स उचलून नेण्याचा प्रकार नाही. ही एक खुली स्पर्धा आहे. जो चांगली सुविधा देईल, सुरक्षा देईल, सामाजिक सुरक्षा आणि कुणासोबतही इथं भेदभाव होणार नाही, असं वातावरण देईल, अशी ही स्पर्धा आहे. एक भारत आणि श्रेष्ठ भारतासाठी वातावरण देण्याची गरज आहे, त्यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे, असंही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं.

मुंबईतील फिल्मसिटी ही मुंबईत काम करेल, उत्तर प्रदेशमध्ये नव्याने फिल्मसिटीची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील दिग्गज लोकांशी चर्चा केली. त्यांच्या अनुभवातून चांगली फिल्मसिटी निर्माण होईल. फक्त एका क्षेत्रासाठी नसून संपूर्ण जगात एक मॉडेल निर्माण होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे’, असंही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.