कोण होणार देशाचे नवे राष्ट्रपती? राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

0
429

राष्ट्रपती निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला आव्हान देऊ शकेल इतपत एकजुट विरोधकांमध्ये आहे की नाही याचा फैसला या निवडणुकीच्या निमित्तानं होईल. पाहुयात कशी रंगणार आहे राष्ट्रपतीपदाची ही निवडणूक. यानुसार, राष्ट्रपती निवडणूक १८ जुलै रोजी होईल. या निवडणुकीत यंदा एकूण ४,८०९ जण मतदान करतील. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाला या निवडणुकीसाठी व्हिप जारी करता येणार नाहीये.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होईल आणि २१ जुलै रोजी मतमोजणी पार पडेल.

राष्ट्रपती पद हे घटनात्मकदृष्ट्या सर्वोच्च पद, देशाचे प्रथम नागरिक. या पदासाठी यावेळी मोदींची निवड काय असणार याची उत्सुकता असेल.

मागच्या वेळी रामनाथ कोविंद यांचं नाव कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. त्याचवेळी अचानक बिहारच्या राज्यपालपदावरुन त्यांची थेट राष्ट्रपती म्हणून निवड झाली. आता यावेळी कुठलं धक्कातंत्र मोदी वापरतात हे पाहणं महत्वाचं असेल.

राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रम काय?

नोटिफिकेशन जारी – १५ जून २०२२
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस – २९ जून २०२२
अर्ज छाननी – ३० जून २०२२
अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस – २ जुलै २०२२
मतदानाचा दिवस – १८ जुलै २०२२
मतमोजणी – २१ जुलै २०२२

कशी होते राष्ट्रपती पदाची निवडणूक?

  • राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार मतदान करतात.
  • प्रत्येक खासदाराच्या मताचं मूल्य हे 700 इतकं असेल.
  • प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य हे त्या राज्यातल्या लोकसंख्येच्या आधारावर ठरतं, त्यासाठी 1971 च्या जणगणनेचा आधार घेतला जातो.
  • महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य हे 175 आहे.
  • देशातल्या एकूण मतांची किंमत होते 10 लाख 86 हजार 431. यापैकी ज्या उमेदवाराला 5 लाख 43 हजार 216 मतं मिळतात तो विजयी ठरतो.

देशातील ७७६ खासदार आणि ४०३३ आमदार असे एकत्रित ४८०९ जण या निवडणुकीचे मतदार असतील. एकूण मतांचे मूल्य हे १० लाख ८६ हजार ४३१ आहे. यामुळे विजयासाठी ५ लाख ४३ हजार २१५ मतांची आवश्यकता असेल. लोकसभेत बहुमत, राज्यसभेतील सर्वाधिक खासदार, देशातील निम्म्या राज्यांमध्ये भाजप किंवा मित्र पक्षांची सत्ता असल्याने जादुई ५ लाख ४३ हजार मतांचा आकडा गाठणे भाजपला फारसे कठीण नाही. भाजपला हा जादुई आकडा गाठण्याकरिता काही मतांची गरज असली तरी बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, अण्णा द्रमुक अशा विविध प्रादेशिक पक्षांच्या मदतीने भाजपला उमेदवार निवडून आणण्यात काहीच अडचण येणार नाही.

भाजपला आव्हान देण्याची संधी 2024 च्या निवडणुकीआधी, या निवडणुकीच्या निमित्तानं विरोधकांना मिळणार आहे. कारण मागच्या वेळी देशात जितके आमदार भाजपचे होते, त्यात काहीशी घट झालेली आहे. राज्यसभेचे खासदार भाजपचे वाढले असले तरी शिवसेना, तेलंगणा राष्ट्र समिती, अकाली दलासारखे पक्ष आता भाजपसोबत नाहीत. त्यामुळे मित्रपक्षांची नव्यानं जुळणी भाजपला करावी लागणार आहे.