पुणे तिथे काय उणे: देशातील आनंदी शहराच्या यादीमध्ये पुण्याचा समावेश

0
370

पुणे तिथे काय उणे असा वाकप्रचार प्रचलित आहे. याच वाकप्रचाराचा प्रत्यय आणखी एकदा आला आहे. कारण भारतामधील सर्वात आनंदी शहरांच्या यादीची घोषणा करण्यात आली आहे. ‘इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’च्या या यादीमधील देशातील सर्वाधिक आनंदी शहरांपैकी अव्वल २५ शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरे आहेत. विशेष म्हणजे आनंदी राहण्याच्या पुण्याने मुंबई आणि नागपूरला मागे टाकले असल्याचे यादीत दिसत आहे.

या यादीमध्ये देशातील सर्वात आनंदी असणाऱ्या ३४ शहरांची यादी देण्यात आली आहे. प्राध्यापक राजेश पिल्लानिया यांनी ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२० दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरांमधील १३ हजारहून अधिक जणांचे सर्वेक्षण करुन ही यादी तयार केली आहे. राजेश हे मागील अनेक दशकांपासून व्यवस्थापनसांदर्भातील संशोधनामध्ये कार्यरत असून त्यांच्या या प्रोजेक्टमुळे पहिल्यांदाच भारतातील वेगवेगळ्या शहरांमधील हॅपीनेस इंडेक्स म्हणजेच आनंदी राहण्याच्या प्रमाणासंदर्भातील माहिती समोर आली आहे.

लुधियाना, अहमदाबाद आणि चंदिगड ही तीन शहरे देशातील सर्वात आनंदी शहरांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहेत. तर अहमदाबाद, हैदराबाद आणि नवी दिल्ली ही शहरे टू टीयर सीटींच्या यादीमध्ये सर्वाधिक आनंदी शहरे ठरली आहेत. त्याचप्रमाणे लुधियाना, चंदिगड आणि सुरत या तीन शहरांनी टू-टीयर सिटींच्या यादीत बाजी मारली आहे. ही यादी वयोमान, शिक्षण, कमाई आणि एकंदरीत एखाद्या शहरात राहताना मिळणाऱ्या सुखसोयी तसेच जीवनशैली यांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात मोठ्या शहरांमध्ये अविवाहित नागरिक हे विवाहितांपेक्षा अधिक आनंदी असल्याचेही दिसून आले आहे.

या यादीमध्ये महाराष्ट्रामधील तीन शहरांचा समावेश असून या यादीत राज्याची संस्कृतिक राजधानी असणारे पुणे शहर १२ व्या स्थानी आहे. राज्याची उपराजधानी असणारे नागपूर शहर १७ व्या स्थानी तर राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई २१ व्या स्थानी आहे. सर्वाधिक आनंदी शहरांच्या यादीमध्ये गुजरातमधील अनेक शहरांचा समावेश आहे.

भारतातील सर्वाधिक आनंदी शहरे खालील प्रमाणे…

१) लुधियाना

२) अहमदाबाद

३) चंदिगड

४) सुरत

५) वडोदरा

६) अमृतसर

७) चेन्नई

८) जयपूर

९) जोधपूर

१०) हैदराबाद

११) भोपाळ

१२) पुणे

१३) नवी दिल्ली

१४) देहरादून

१५) फरिदाबाद

१६) पाटणा

१७) नागपूर

१८) इंदूर

१९) कोच्ची

२०) भुवनेश्वर

२१) मुंबई

२२) गुवहाटी

२३) धनबाद

२४) नोएडा

२५) जम्मू

२६) कानपूर

२७) बंगळूरु

२८) कोलकाता

२९) लखनऊ

३०) शिमला

३१) रांची

३२) गुरुग्राम

३३) विशाखापट्टणम

३४) रायपूर