रॅपिड अँटिजेन टेस्ट: पुण्यात अर्ध्या तासात होणार करोना टेस्ट

0
271

पुणे शहरात करोना विषाणूंचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिके मार्फत आयसीएमआर मान्यता प्राप्त 1 लाख रॅपिड अँटिजेन टेस्ट किट खरेदी केले आहेत. हे सर्व किट दाखल झाले असून यामुळे एखाद्या व्यक्तीला करोना झाला आहे किंवा नाही, याबाबतची माहिती केवळ अर्ध्या तासात समजणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

विशेष म्हणजे, या टेस्टचा अहवाल अवघ्या अर्ध्या तासात मिळणार आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. हे किट कसे वापरायचे, याचे प्रशिक्षण संबंधित कंपनीने महापालिकेच्या डॉक्‍टर तसेच स्टाफला शनिवारी ऑनलाईन ऍपद्वारे दिले आहे.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे शहरातील करोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता. स्थायी समिती मार्फत 1 लाख रॅपिड अँटिजेन टेस्ट किट खरेदी करण्याचा निर्णय घेतला गेला. या एका किटची किंमत 450 रुपये असून एखादा व्यक्ती बाधित असल्यास, त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क व्यक्तिच्या तपासण्या करण्यास अधिक फायदेशीर ठरणार आहे.

अत्यंत तातडीच्या प्रसंगी रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी ‘आयसीएमआर’ने मान्यता दिलेली आहे. या टेस्ट किटचा वापर कंटन्मेंट झोन, हॉटस्पॉटमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे शक्‍य आहे. तसेच अतिजोखमीच्या रुग्णांसाठी त्यात, हृदयरोग, फुप्फुस, किडनी, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, एचआयव्ही बाधित अशा व्यक्तींच्या तातडीच्या तपासणीसाठीही मान्यता आहे. सध्या बाधित रुग्ण आढळल्यानंतर संपर्कातील सर्वांना चाचणीसाठी नेले जाते. शहरात सरासरी एका बाधितामागे असा जवळचा संपर्क असलेल्या 10 व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे पालिकेस या सर्वच संशयितांच्या चाचण्या कराव्या लागतात. तर चाचण्यांची क्षमता कमी असल्याने हे अहवाल येण्यास तीन ते चार दिवस लागतात. त्यामुळे या सर्व व्यक्तींना पालिकेस संस्थात्मक विलगीकरणात तीन ते चार दिवस ठेवावे लागते. त्यासाठी त्यांच्या वाहतूक, जेवण आणि वास्तव्याची जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, ‘रॅपिड अँन्टिजेन टेस्ट’मुळे हा ताण कमी होणार आहे.

बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचे नमुने घेतल्यानंतर अवघ्या अर्धा तासात संपर्कातील करोना बाधा झालेले इतर व्यक्‍ती सापडणार आहे. त्यांना लक्षणे नसल्यास घरीच विलगीकरणात ठेवता येणार आहे. तर उर्वरित बाधा न झालेल्या सर्वांना घरी सोडणे शक्‍य होणार असून संभाव्य खर्च टळणार आहे.