नो हॉर्न मोहिम: पुण्यात शनिवारी एक दिवस हॉर्नला पूर्ण विश्रांती

0
294
  • शनिवारी (१२ डिसेंबर) ‘एक दिवस हॉर्नला पूर्ण विश्रांती’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

देशात दिवसेंदिवस गाड्यांचे प्रमाण इतके वाढत चालले आहे ज्यामुळे ट्रॅफिक जॅम, वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. लोकांची बदलती लाईफस्टाईल दुचाकी वाहनांसोबत चार चाकी वाहनांची संख्या देखील वाढत चालली आहे. ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होत असल्याने सर्रासपणे गाड्यांच्या हॉर्नचा सतत वापर केला जातो. घाईत असताना रस्ता लवकरात लवकर पार करुन निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी गाड्यांचे हॉर्न सतत वाजवले जातात. ज्यामुळे ध्वनीप्रदूषणाचा धोका निर्माण होतो. या गोष्टीला आळा घालण्यासाठी पुण्यात उद्या ‘नो हॉर्न’ दिवस साजरा केला जाणार आहे. उद्या (12 डिसेंबर) पुण्यात गाड्यांच्या हॉर्नला एक दिवस विश्रांती दिली जाणार आहे.

पुण्यात साधारणत: दररोज एक कोटीपेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजविला जातो व यातील ९० टक्के वेळा हॉर्न हे अनावश्यक असतात. बहुतांश पुणेकर हे दिवसाला दीड ते दोन तास वाहतूक कोंडीमध्ये असतात आणि या अनावश्यक हॉर्नमुळे त्यांना दुष्परिणामांना सामारे जावे लागते, त्यामुळे ‘नो हॉर्न’ या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी लाईफ सेव्हिंग फाउंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि पुणे पोलीस वाहतूक विभागातर्फे एक दिवस हॉर्नला पूर्ण विश्रांती अशी संकल्पना राबविण्यात येत आहे, अशी माहिती लाईफ सेव्हिंग फाउंडेशनचे देवेंद्र पाठक यांनी गुरुवारी दिली. नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू आणि प्रा.पद्माकर पुंडे या वेळी उपस्थित होते.

शनिवारी दुपारी बारा वाजता प्रातिनिधिक स्वरूपात टिळक चौक येथे जनजागृतीपर कार्यक्रम होणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे, क्रीडा समालोचक सुनंदन लेले, डॉ.राजेश देशपांडे, साई पॅकेजिंगचे शंतनु प्रभुणे उपस्थित राहणार आहेत.

शाळा, रुग्णालये अशा ठिकाणी ‘नो हॉर्न’ विषयी जनजागृती करणारे फलक असतात, पण त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्याची आठवण पुणेकरांना करून देण्यासाठी हे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या ध्वनिप्रदूषणात हॉर्नचा आवाज प्रमुख कारण आहे. त्यामुळे पुणेकरांना उच्च रक्तदाब, हदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा सामना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी नो हॉर्न संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे.