पुण्यात 8 नव्हे 6 च्या आत घरात: मनपा आयुक्तांकडून सुधारित आदेश जारी

0
250

करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रणाबाबत पुणे शहरासाठी सुधारित आदेश काढण्यात आले आहेत. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश काढले आहेत. अत्यावश्यक सुविधा वगळता पुण्यातील सर्व दुकानं देखील  उद्यापासून बंद राहणार. पुण्यात आतापर्यंत संध्याकाळी सहा ते पहाटे सहा या कालावधीत नाईट कर्फ्यु होता.  मात्र दिवसा सर्व दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी होती.  मात्र राज्य सरकारने राज्यात सर्वत्र अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो पुण्यात देखील उद्यापासून लागू  होणार आहे.

नवीन आदेशानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध असणार असून, कलम १४४(जमावबंदी) लागू करण्यात येत आहे. याचबरोबर, पुणे महानगरपालिका क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ६ ते सकाळी ७ या कालावधीत तसेच शुक्रवार सायंकाळी ६ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक कारण/ अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णत: प्रतिबंध(संचारबंदी) करण्यात येत आहे.

अत्यावश्यक सेवांमध्ये रूग्णालयं, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसीज व फार्मासिटीकल कंपनी, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरी, मिठाई व खाद्यपदार्थांची दुकाने, सार्वजनिक वाहतूक – सार्वजनिक बस, टॅक्सी, रिक्षा, रेल्वे, पूर्व पावसाळी नियोजित कामे, स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सार्वजनिक सेवा, मालवाहतूक, कृषी संबंधित सेवा, ई- कॉमर्स, मान्यताप्राप्त मीडिया, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे घोषित केलेल्या अत्यावश्यक सेवा यांचा समावेश असणार आहे.

  • बँक, दूरसंचार कंपनी, वीज कंपनी, विमा कंपनी, आयटी अशा आवश्यक सेवा देणाऱ्या कंपन्या वगळता खासगी कार्यालये बंद राहतील सरकारी कार्यालये 50 टक्के उपस्थितीत सुरू राहतील. कोव्हिडसंबंधी काम करणारी आस्थापना 100 टक्के क्षमतेसह सुरू राहतील.
  • सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध
  • संचारबंदीच्या कालावधी सर्व दुकानं, मार्केट, मॉल (अत्यावश्यक सेवा वगळून) पूर्णपणे बंद राहतील.
  • हॉटेल्, बार, रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6 ते सकाळी 7 हॉटेलमधून पार्सल नेण्याची सोय आणि होम डिलिव्हरी सुरू असेल. शुक्रवार संध्याकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 होम डिलीव्हरी मिळेल पण ग्राहकांना हॉटेलमधून पार्सल नेता येणार नाही.
  • याशिवाय सर्व धार्मिकस्थळ बंद राहणार आहेत.
  • सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
  • तसेच, शुक्रवारी सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत या कालावधीत संपूर्णत: बंद राहणार आहे.
  • रिक्षामधून प्रवास करताना वाहन चालक आणि दोन व्यक्तींना परवानगी तर कॅबसाठी 50% आसन क्षमता.
  • नागरिकांनी वावरताना समाजिक अंतर व स्वच्छता बाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
  • पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने, मार्केट व मॉल (अत्यावश्यक सेवा वगळून) संपूर्णत: बंद राहणार आहेत.