राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यानुसार, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा पातळीवर निर्णय घेतले जात आहेत. पुणे शहराच्या बाबतीतही असाच दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. करोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राज्य सरकारने पाच स्तर निश्चित केले आहेत. या स्तरांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले असून, पुण्यातील निर्बध शिथिल करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली. पुण्यातील मॉल्स आणि दुकानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मॉल्सबरोबर दुकानं ७ वाजेपर्यंत, तर रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. सोमवारपासून हे निर्णय लागू होणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज काउन्सिल हॉल इथं झालेल्या बैठकीत शहरासह जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी काही निर्णयांची घोषणा केली. त्यानुसार, पुणे शहरातील दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत, तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तसंच, येथील मॉल देखील सुरू होणार आहेत. अभ्यासिका, वाचनालये सुरू करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. सोमवारपासून या निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे. चित्रपटगृह आणि नाट्यगृहं मात्र तूर्त बंदच राहणार आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील निर्बंधांमध्ये सध्या कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. करोनाच्या संसर्गाच्या सध्याच्या स्थितीत बदल झाल्यास त्यानुसार निर्बंध कमी-जास्त केले जातील. त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
सोमवारपासून हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. मात्र, सोमवारपासून ही परवानगी देण्याआधी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषाचाही विचार केला जाणार आहे. त्याबद्दलही अजित पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली. “सोमवारपासून या परवानग्या दिल्या जाणार असल्या, तरी पॉझिटिव्हीटी रेट बघितला जाणार आहे. पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत असेल, तर हे चालू केलं जाईल, अन्यथा निर्णय बदलावा लागेल. त्यामुळे माझं पुणेकरांना आवाहन आहे की, त्यांनी नियमांचं पालन करावं, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.