पुण्यात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी

0
377

राज्यात कोरोनामुळे बनलेली भीषण परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला होता. प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो. त्यामुळे प्रदूषण करणारे फटाके टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले होते.

दरम्यान, पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता आणि दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने दिवाळी सणात सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, दिवाळी पहाटचे कार्यक्रम घेण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. असा आदेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी काढला आहे.

दिवाळीत पुणे महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडायला बंदी घालण्यात आलीय. उद्याने, शाळा , मैदाने अशा ठिकाणी फटाके फोडता येणार नाहीत. त्याचबरोबर खाजगी जागेतही कमीतकमी प्रमाणात, कमी आवाजाचे आणि कमी धुर निर्माण करणारे फटाके उडावावेत अशा सुचना करण्यात आल्यात. फटाके उडवताना सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे , सॅनिटायझर हे ज्वलनशील असल्याने दिवाळीच्या काळात हात धुण्यासाठी साबणाचा वापर करावा असही पुणे महापालिकेच्या सुचनापत्रकात नमुद करण्यात आलंय. पुण्यात दिवाळीत फटाके उडवण्यास बंदी नसली तरी फटाके उडवताना नागरिकांना महापालिकेच्या या सुचनांचे पालन करावे लागणार आहे.

शिवाय, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्कचा वापर न करणे व विना परवाना कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे आढळल्यास पोलीस आणि महापालिका प्रशासनास कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले आहे.

वाढत्या प्रदुषणामुळे करोना वाढण्याचा धोका असून, त्यामुळे देशातील विविध राज्यातील फटाक्यांवर बंदी घातली आहे. राज्यातही सरकारनं सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मज्जाव करत फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.