पुणेकरांसाठी खूशखबर; पीएमपीएल बस सेवा लवकरच सुरु होणार

0
266
  • पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरु होणार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी खुशखबर आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. त्यामुळे तब्बल 5 महिन्यांनंतर पीएमपीएल रस्त्यावर धावणार आहे. गणेश चतुर्थीला पीएमपीएलची सेवा 22 तारखेला सुरु होण्याची शक्यता आहे. पीएमपीएल प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. यानंतर अजित पवार यांनी याला तत्वतः मान्यताही दिली. त्यामुळे आता 22 ऑगस्टला पीएमपीएल बससेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीएमपीएल प्रशासनाने पुढील आठवड्यात बसेस सुरु होतील असं सांगितलं आहे. मात्र, निश्चित तारिख सांगितलेली नाही.

बस सेवा ठप्प असल्याने पीएमपीएमएलला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासह देखभाल दुरुस्तीचा खर्चही आवाक्याबाहेर गेला आहे. पीएमपीएमएलला प्रतिदिन साधारण दीड कोटीपर्यंत उत्पन्न मिळतं, आतापर्यंत पीएमपीएमएलला साधारण 200 कोटीचा फटका बसला आहे. यासंदर्भात सोमवारी पुणे आणि मंगळवारी चिंचवड मनपा आयुक्त आणि पीएमपीएमएल प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्हा प्रशासन आणि पीएमपीएलच्या या निर्णयामुळे पुण्यातील नागरिकांना दळणवळणात मोठी मदत होणार आहे.

पहिल्या टप्प्यात साधारण 400 ते 450 बसेस शहरात सुरू होणार आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर बस सेवा सुरू होणार असल्याची माहिती आहे. नागरिकांच्या प्रतिसादानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात पीएमपीएमएल सुरू होणार आहे. या निर्णयामुळं सर्वसामान्य पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजीकल डिस्टन्सिंग सांभाळत मर्यादित प्रवाशांना परवानगी दिली जाणार आहे. बस दिवसातून 2-3 वेळा निर्जंतूक केली जाईल. प्रवाशांना मास्क बंधनकारक करण्यात येणार आहे.