पुण्याचे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी आज एक आदेश जारी केला आहे. यामध्ये त्यांनी ३१ डिसेंबरची नियमावलीसंदर्भातील दहा मुद्द्यांची माहिती दिली आहे. ३१ डिसेंबर रोजी पुण्यामध्ये कोणत्या गोष्टी कधीपर्यंत सुरु राहतील तसेच नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना काय काळजी घ्यावी यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ११ वाजल्यानंतर संचारबंदीची घोषणा करण्यात आली असतानाच पुण्यामध्ये ३१ डिसेंबर रोजी हॉटेलमधून येणारी होम डिलेव्हरीही केवळ पावणे अकरापर्यंत सुरु राहणार असल्याचं या नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
३१ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरापर्यंतच पुणे महानगरपालिका श्रेत्रातील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तराँ तसेच बार सुरु राहणार आहेत. रात्री पावणे अकराला सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तराँ बंद होतील. त्याचप्रमाणे होम डिलिव्हरीची सुविधाही पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार असल्याचे या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जर ११ नंतर होम डिलिव्हरी हवीअसेल तर ती पुणेकरांना मिळू शकणार नाही. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी पुणेकरांनी घरच्या घरीच दुसरी सोय करावी.
करोनाच्या अनुषंगाने दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व १ जानेवारी २०२१ रोजी नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घऱाबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरी साधेपणे करावे.
नागरिकांनी ३१ डिसेंबर दिवशी पुणे महानगरपालिकेच्या श्रेत्रामधील उद्याने, मैदाने, पर्यटनस्थळे तसेच रस्त्यावर अशा सर्वाजनिक ठिकाणी मोठ्या संख्यने गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देऊन आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी.
कोणत्याही प्रकार गर्दी आकर्षित होईल अशा प्रकारचे धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यात येवू नये.
सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तराँ रात्री पावणे अकराला बंद होतील. त्याचप्रमाणे होम डिलेव्हरीची सुविधाही पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहे. होम डिलेव्हरीची सेवा पावणे अकरानंतर उपलब्ध नसेल.
फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येवू नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात यावे.