अनंत चतुर्दशीला पुणे बंद; केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार – अजित पवार

0
435

कोरोना संसर्गाचा वाढता धोका पाहता अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील निर्बंध अधिक कडक केले जाणार आहे. पोलिसांकडून उत्सवासाठी नियमावली लागू करण्यात आली आहे. विसर्जनाच्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात गणपती विसर्जना दिवशी निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गणेश विसर्जनाला पुणेकर मोठ्या संख्येनं घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्व दुकाने बंद करुन निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, विसर्जनाच्या दिवशी दुकाने बंद राहणार आहे. मात्र असे असले तरी हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरूच राहतील. सध्या कोरोना हा नियंत्रणात आहे. मात्र, गणेशोत्सवानंतर काय होईल याविषयी सांगता येत नाही. परिस्थिती नियंत्रणात राहिली, तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत हे निर्बंध असेच राहतील. परिस्थिती सुधारली तर 2 ऑक्टोबरपासून पुण्यातील निर्बंधांविषयी पुढील निर्णय घेतला जाईल, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

यासोबतच रस्ते, पदपथांवर मूर्ती विक्री स्टॉल लावू नयेत, यासोबतच प्रतिष्ठापना आणि विसर्जन सोहळ्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना यावेळी देखील परवानगी दिली जाणार नाही, अशी नियमावली पोलिसांनी तयार केली आहे.