Pune Fire : पुण्यातील फॅशन स्ट्रीटमधील आगीत व्यापाऱ्यांचं करोडोंचं नुकसान

0
200

पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये लागलेली भीषण आग तीन तासांनी आटोक्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल 800 दुकानं आगीच्या कचाट्यात सापडली आहे. तसेच या आगीमुळे व्यापारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पुण्यातील एमजी रोडवरील (MG Road) फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागल्याने माहिती मिळताच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहोचले होते. अग्निशमन दलाने तब्बल 16 बंब वापरून दोन तासात ही आग आटोक्यात आणली. पिंपरी चिंचवडच्याही फायर ब्रिगेड गाड्यांना आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं. साधारण मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश आलं होतं. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत याठिकाणी कुलिंगचे काम सुरू होतं. दरम्यान या आगीचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

सुदैवाची बाब म्हणजे ही आग आजबाजुच्या दाट लोकवस्ती इमारतींपर्यंत न पोचल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पण फॅशन स्ट्रीटवरील कित्येक दुकानदारांचा करोडोंचा माल आगीत जळून खाक झाला आहे.

फॅशन स्ट्रीटवर लागलेल्या आगीची तीव्रता मोठी असून या दुर्घटनेत मार्केटचे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन विभागाने पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागासोबत फॅशन स्ट्रीटचे फायर ऑडिट केले होते. त्यामध्ये फॅशन स्ट्रीटला आग लागण्याची भीती वर्तविण्यात आली होती. त्यामुळे बोर्डाने गाळेधारकांवर कारवाईची मोहीमही हाती घेतली होती. त्या विरोधात फॅशन स्ट्रीटमधील व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे ही कारवाई थंड बस्त्यात पडली होती. बोर्डाच्या अध्यक्षांनी काही महिन्यांपूर्वी फॅशन स्ट्रीटची पाहणी करत नव्याने फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.