पुण्यातला लक्ष्मी रोड आज बंद, नो व्हेईकल डे निमित्त रस्त्याचा थाटमाट

0
549
  • महापौर मुरलीधर मोहोळ यावेळेस पुणे वॉकिंग हॅपीनेस इंडेक्सचे (Pune Walking Happiness Index) लोकार्पण करणार आहेत
  • सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खाजगी वाहनांना मज्जाव

पादचार्‍यांच्या सुरक्षेचा विचार करता पुणे महानगरपालिकेकडून (PMC) आज (11 डिसेंबर) खास सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं आहे. या निमित्ताने पुण्यातील लक्ष्मी रोड वर ‘ओपन स्ट्रिट मॉल’ ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यासाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत खाजगी वाहनांना मज्जाव करण्यात आला आहे. नगरकर तालिम चौक ते उंब्र्या गणपती चौक मध्ये 11 ते 4 पर्यंत वाहनांची वर्दळ बंद ठेवली जाईल तर पार्किंग देखील नसेल.

दरम्यान या काळात लोकांना खाजगी कार ऐवजी सार्वजनिक बस सेवेचा वापर करण्याचं आवाहन केले आहे. कुणी खाजगी वाहनाने आल्यास त्यांना लक्ष्मी रोड पासून दूर पार्किंग करावं लागणार आहे. आज त्यामुळे का होईना आज लक्ष्मी रस्त्याला एका दिवसासाठी मोकळा श्वास घेता येणार आहे.

आज ठिकठिकाणी लक्ष्मी रोड सजवला असून त्या परिसरामध्ये स्वच्छतासुद्धा पाहायला मिळत आहे. परिसरातील नागरिक व्यापाऱ्यांनी देखील याचं स्वागत केलं आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यावेळेस पुणे वॉकिंग हॅपीनेस इंडेक्सचे (Pune Walking Happiness Index) लोकार्पण करणार आहेत. जे शहरातील निवडक रस्त्यांवरील पादचाऱ्यांच्या समाधानाची पातळी मोजण्यासाठी एक साधे साधन आहे. पादचार्‍यांच्या सुरक्षेबाबत जनजागृती पसरवण्यासाठी स्वतंत्र थिएटर ग्रुप पथनाट्य देखील सादर करणार आहे. इतर काही सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत लाईव्ह म्युझिक शो देखील होणार आहेत.

लहान मुलांसाठी देखील यामध्ये काही मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये काहींना रोड पेंट करण्याची देखील संधी मिळणार आहे. यानिमित्ताने नागरिकांना गाड्यांच्या गजबटाशिवाय लक्ष्मी रोडवर फिरता येणार आहे. तसेच शॉपिंगचा आनंद घेणार आहे.