पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन

0
527

(घरी राहा आणि स्वतःची काळजी घ्या)

करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे आदेश दिले आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 13 जुलै ते 23 जुलै या दरम्यान पुणे शहरात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनविषयी माहिती दिली आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होईल. लॉकडाऊनच्या पहिल्या पाच दिवसांत निर्बंध हे अत्यंत कडक असतील. केवळ दूध विक्रेते, औषधांची दुकाने आणि दवाखानेच सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून पास दिले जातील. या काळात भाजीपालाही उपलब्ध होणार नाही. १८ जुलैनंतर लॉकडाऊन काहीप्रमाणात शिथील होईल. त्याबाबतच्या सूचना पुढील दोन दिवसांत दिल्या जातील, अशी माहिती दीपक म्हैसकर यांनी दिली.

पुणे शहरात तर कडक लॉकडाऊन असेल, तर जिल्ह्यातील संक्रमण असलेल्या भागातही लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता पुन्हा एकदा शिस्त दाखवत अत्यावश्यक काम नसेल तर घरातच थांबावं लागणार आहे. अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल. तर पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनीही नागरिकांना हा लॉकडाऊन गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला. नागरिकांना कुठे बाहेर जायचे असेल तर आत्ताच जाऊन यावे. काही खरेदी करायची असेल तर आधीच करुन घ्यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. अत्यावश्यक प्रवासासाठी ई पास गरजेचा असेल असेही यावेळी सांगण्यात आले.

सुमारे ७२ दिवसांच्या लॉकडाऊननंतर राज्य सरकारनं जूनच्या सुरुवातीपासून अनलॉकला सुरुवात केली होती. तेव्हापासून सार्वजनिक वाहतूक वगळता सर्व व्यवहार टप्प्याटप्प्यानं पूर्ववत केले जात आहेत. मात्र, लॉकडाऊन जसजसे शिथिल होत आहे, तसतसे करोनाचे रुग्ण वाढत असल्याचं निदर्शनास येत आहे. पुणे जिल्ह्यातही रुग्ण वाढीचं प्रमाण मोठं आहे. नागरिकांची बेफिकीरी देखील यास कारणीभूत ठरली आहे.

असे असेल लॉकडाऊन स्वरूप :

  •  सोमवार रात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू
  •  एकूण दहा दिवस पुण्यात लॉकडाऊन
  • अत्यंत कडक लॉकडाऊन केला जाईल
  • 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन असणार
  • दूध विक्रेते, औषधे दुकाने, दवाखानेच सुरु राहणार
  • 13 जुलै ते 18 जुलै दरम्यान कडक अंमलबजावणी
  •  सुरुवातीला पाच दिवस कडक अंमलबजावणी
  •  18 जुलैनंतर काय सुरु राहील त्याबाबत दोन दिवसात नवीन सूचना देण्यात येईल
  •  अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना पोलिसांकडून ऑनलाइन पास दिला जाईल
  •  पुणेकरांनी भाजीपाला आणि इतर वस्तूंची खरेदी करुन घ्यावी
  • आरोग्य, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या सेवाच सुरु राहतील