परतीच्या पावसाचं राज्यात धुमाकूळ सुरु झाला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, पुण्यात तर कहर झाला आहे. पुण्यात बुधवारी रात्री मुसळधार पावसानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून, आज मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
हवामान विभागाने दोन दिवसांपासूनच पुण्यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. हा अंदाज खरा ठरवत, काल संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढत गेला. रात्री नऊच्या दरम्यान ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट वाढला. रात्रीच्या निरव शांततेत आकाशात सुरु असलेल्या य जुगलंबंदीने लोकांना धडकी भरली. रात्री साडे नऊनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाला जोर प्रचंड असल्याने घरातून पलीकडील इमारत देखील दिसत नव्हती. रस्त्यावरुन जाणाऱया दुचाकी, चारचाकी चालकांना गाडी चालविणे अवघड झाले. बघता बघता मुख्यरस्ते, उपनगरातील गल्ली बोळांमध्ये पाणी साठायला सुरुवात झाली आणि पाण्याचे लोंढे वाट मिळेल तिथून वाहत होते.
पुण्यात मुळसधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुण्यातील या परिस्थितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये शहरात पूर आल्यासारखं पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. अनेक गाड्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. पुण्याच्या हिंगणेखुर्द परिसरातील हा व्हिडीओ आहे. संपूर्ण रस्त्यांना नदीचं स्वरुप आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आज हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, सिंहगड रस्ता परिसरात वाहने वाहून गेली. चंदननगर पोलीस स्टेशनमध्येही पाणी शिरलं. दांडेकर पुलालगत सर्व्हे नंबर १३३ मधील काही नागरिकांना साने गुरुजी शाळा आणि मनपा कॉलनी शाळा या दोन्ही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. या भागातून जाण्याचं टाळावं अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणात पाणी वाढले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून ३ हजार ४२० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यानंतर परिस्थितीनुसार हा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे. पानशेत धरणातून दोन हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे नदी काठच्या रहिवाश्यांना सतर्कतेच्या सूचना जलसंपदा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आजच्या नियोजीत सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लवकरच सुधारीत वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहिती देण्यात येतेय. पुण्यातील अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे आजच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.