पुण्याचे आकर्षण नाही, पुणे पाहिले नाही किंवा पुण्याची माहिती नाही, अशी माणसं किमान महाराष्ट्रात तरी सापडणे कठीण. पुणे हे असे शहर आहे, ज्याची किमान माहिती तरी प्रत्येक माणसाला माहीत असणार आहे. त्यातला त्यात पुण्यामध्ये स्वारगेट हे ठिकाण माहीत नसणारे चुकूनही सापडणार नाही. पुण्यात आला तर स्वारगेटला एखादी चक्कर नक्कीच झाली असेल नाही का? तर आपण आज स्वारगेट हे नाव कसे काय पडले याबद्दल जाणून घेणार आहोत.
स्वारगेट हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचे एक उपनगर आहे. पुण्यात प्रवेश करताना स्वारगेट हे नाव चुकत नाही; तसेच तो शहराचा मध्यवर्ती भाग असल्याने टाळता येत नाही. राज्यातील कोणत्याही बस स्टँडला स्वारगेटसारखे वलय नाही. स्वारगेट येथे एस. टी. महामंडळाचे पुणे विभागीय कार्यालय; तसेच जवळ पीएमपीचा डेपो आहे. जेधे चौकात साकारल्या जाणाऱ्या भव्य प्रकल्पामध्ये एसटी व पीएमपी बस स्थानक आणि मेट्रो असे वाहतुकीचे जाळे निर्माण होणार आहे.
स्वारगेटची माहिती घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावे लागेल. आधुनिक वाहने नव्हती, तेव्हाही स्वारगेट होते. ब्रिटिश काळात येथे घोड्यांचा तबेला आणि घोडेस्वार असत. त्यामुळे या ठिकाणाला स्वारांचे गेट म्हणून स्वारगेट म्हटले जाऊ लागले. दोन भाषेतील शब्दांपासून आकारास आलेला हा शब्द रूढ झाला. शाहिस्तेखान पुण्यात ठाण मांडून होता, तेव्हा तिथे छावणीचे स्वरूप आले होते. कात्रजच्या घाटाकडे जाऊ लागलो, की जिथे मुख्य चौकी होती ते म्हणजे आजचे स्वारगेट असे म्हटले जाते. पण याबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे इतिहास अभ्यासक मंदार लवाटे स्पष्ट करतात. ब्रिटिश काळात कोतवाली बंद होऊन पोलिस व्यवस्था आकारास आली आणि या ठिकाणाला गेट व पुढे स्वारगेट म्हटले जाऊ लागले ज्यांनी ज्यांनी पुण्यावर राज्य केलं त्यांनी आज स्वारगेट आहे त्या ठिकाणी चौकी उभी केली.पुण्यात प्रवेश करायचा झाला तर तिथल्या घोडेस्वार पहारेकऱ्यांना ओळख पटवूनच मगच गावात शिरता येई.पेशवाईत जकात गोळा करण्यासाठी हे मुख्य ठाणे होते. पुढे इंग्रज अमलात कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले. आणि नाके किंवा चौकी असे न राहता त्याचे नाव ‘गेट’ असे झाले. म्हणून घोडेस्वार तैनात असलेले नाक्याचे ठिकाण पुढे “स्वारगेट” असे ओळखले जाऊ लागले. आज स्वारगेटप्रमाणे रामोशीगेट, म्हसोबागेट, पुलगेट, पेरुगेट ही गेट आजही पुण्यात अस्तित्वात आहेत.
1940 पासून स्वारगेटला बस धावू लागल्या
इ.स. १९४० मध्ये स्वारगेटहून पहिली बस धावली. त्याच्याआधी पुण्यात टांगे अस्तित्वात होते. आज हा परिसर स्वारगेट नावाने ओळखला जातो तरी येथील बसस्थानकाचे नाव ‘छत्रपती राजर्षि शाहू महाराज बसस्थानक’ असे आहे. स्वारगेट चौकाचे नाव ‘देशभक्त केशवराव जेधे चौक’ असे आहे. त्यांचा पूर्णाकृती पुतळ्यासह त्यांचा संक्षिप्त जीवनपट येथे लावला आहे. चौकातून गेलेल्या उड्डाणपुलास सुद्धा त्यांचेच नाव आहे. तरीही तो स्वारगेट चौक या पुण्यातल्या इतर ठिकाणांप्रमाणे जुन्या नावानेच ओळखला जातो.
पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणावर मेट्रोचे काम चालू झाले आहे. त्यात ‘पिंपरी चिंचवड ते स्वारगेट’ हा मार्ग पुणे मेट्रोच्या तीन मुख्य कॉरिडॉर पैकी एक कॉरिडॉर असणार आहे. ‘पुणे मेट्रो स्वारगेट मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब’ लवकरच येथे उभे राहणार असल्याचे कळते. हे देशातले पहिलेवहिले मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब असणार आहे. मध्यंतरी स्वारगेटजवळ भुयारी मेट्रोचे काम चालू असताना २ भुयारी मार्ग सापडले. स्वारगेट ते सारसबाग या रस्त्यावर इ.स. १९१५ मध्ये स्वारगेट जलकेंद्र होते. सुमारे शंभरवर्षांपूर्वी पाण्याच्या व्यवस्थेसाठी ही भुयारं बांधली असतील.
वाढत्या गर्दीमुळे तसेच एसटीबस आणि मेट्रोमुळे स्वारगेट आता बदलत चालले आहे.पूर्वीचे स्वारगेटचे महत्व, तिथला दरारा आता संपला आहे. ना घोडेस्वारांचे ठाणे उरले, ना पहारेकरांच्या चौक्या. एका बाजूला चौकात छोटी पोलीस चौकी आहे. ती रहदारीच्या, गजबजलेल्या या भागाचा भार सांभाळत उभी आहे