पुण्यातील तुळशीबाग ऐतिहासिक आणि सर्वांना आकर्षित करणारे ठिकाण

0
1592

पुण्यात आला आणि तुळशीबागला खरेदी नाही केली असा एखादा माणूस सापडणार नाही. महिलांची तर पुण्यातील सर्वात आवडती जागा तुळशीबाग. पुण्यातील तुळशीबागेला अडीचशे वर्षांचा जागता इतिहास आहे. तुळशीबागेचे स्वरूप एका जुन्या राममंदिराभोवती उभा राहिलेला बाजार असे आहे. पिन टू पियानो… म्हणाल ती संसारोपयोगी वस्तू तेथे विकत मिळते. पेशवेकालीन मॉल असे त्याचे वर्णन रास्त होईल. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात सुप्रसिद्ध विश्रामबाग वाड्याच्या समोर असलेलं ठिकाण म्हणजेच ‘तुळशीबाग’! राममंदिरासाठी प्रसिद्ध तसंच सर्वांचंच आणि मुख्यत्वे स्त्रियांचं हे आवडतं ठिकाण. स्वयंपाकाची भांडी असोत की बाकी घरातल्या वस्तु असोत, सौंदर्य प्रसाधने असोत की दागिने असोत किंवा कपडे असोत. पुजा साहित्याचीही अनेक दुकाने, अगदी देवांच्या सुबक मुर्तींपासून पुजेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची दुकानं इथे आहेत.

तुळशीबाग नावामागील इतिहास:

पेशवाईतील गोष्ट! साताऱ्याजवळ पाडळी नावाचे एक गाव आहे. या गावात आप्पाजी खिरे नावाचे एक गृहस्थ राहत. हे त्या गावचे वतनदार होते. त्यांच्याकडे या गावचं कुलकर्णीपणाची जवाबदारी होती. अप्पाजींना नारायण नावाचा धाकटा मुलगा होता. तो कुटुंबात फार लाडका होता. साधारण १७०० च्या दरम्यानचा याचा जन्म! नारायण हा खुप हट्टी होता. यामुळे त्याच्या भविष्याबद्दल आई-वडिलांना फार चिंता वाटत होती. एकदा आई त्याला यावरुन काहीतरी बोलली म्हणुन हा नऊ दहा वर्षांचा मुलगा ‘आपलं नशीब मी स्वतः घडवुन दाखवीन’ या इर्षेने घरातुन एकटाच चालत चालत निघाला आणि पुण्यात आला. पुण्यात शहरभर हा फिरला आणि दिवस मावळेपर्यंत हा एकदम थकुन गेला होता. मग पुण्यातील आंबिल ओढ्याच्या काठी असलेल्या रामेश्वराच्या मंदिरात तो आला आणि महादेवाचे दर्शन घेऊन तिथेच एका कोपऱ्यात तो निजुन गेला. त्या मंदिरात दररोज सकाळी सुर्योदयाच्या वेळी गोविंदराव खासगीवाले देवदर्शनासाठी येत. त्या दिवशी आल्यावर त्यांनी नारायणाला कोपऱ्यात गाढ झोपलेलं पाहीलं. त्याला त्यांनी उठवलं आणि त्याची आस्थेने चौकशी केली. सगळं प्रकरण कळल्यावर त्यांनी त्याला आश्रय दिला. स्वतःकडे आपल्या शागिर्दांमध्ये नोकरीस ठेवले. त्याला ते लाडाने ‘नारो’ म्हणत आणि पुढं त्यांचं तेच नाव रूढ झालं. ब्राह्मण असल्यामुळे त्याचाकडे खासगीवाल्यांनी आपल्या रोजच्या पुजा अर्चेसाठी तुळशी, बेल, दुर्वा, फुले वगैरे आणण्याचं काम दिलं. आजची जी तुळशीबाग आहे ती त्या काळी पुण्याच्या बाहेर होती. एक एकर भर पसरलेल्या या जागेत त्या काळी खासगीवाल्यांची स्वतःच्या मालकीची तुळशीची बाग होती. विविध फुले वगैरे इथे त्यांनी वाढवली होती आणि तुळस ही तिथे जास्त प्रमाणात होती. म्हणुन त्याच नाव ‘तुळशीबाग’ असे पडले. या बागेतुन तेव्हा नारो तुळस फुले आणायचा. आपल्या कामातील मेहनतीच्या बळावर त्याने खासगीवाल्यांचा विश्वास संपादन केला. कामातील निष्ठा पाहुन पुढे खासगीवाल्यांनी आपल्या लाडक्या नारोला पेशव्यांच्या खासगीतील हिशोब वगैरे करण्यासाठी चाकरीत सामावुन घेतले. पुढे नानासाहेब पेशव्यांनी त्याची कामाची पद्धत, शिस्त, वागणुक आणि चोख हिशोब वगैरे पाहुन त्याला कोठी खात्याच्या कारकून पदावर नेमले. एकदम एवढी मोठी जवाबदारी अंगावर आल्याने त्याला गर्व झाला. एकदा दसऱ्याच्या दिवशी खासगीवाल्यांनी नारोला आपल्या घरी जेवायला बोलावले. पण इतरांसारखे आपल्याला चांदीची ताटे वगैरे न देता साध्या पंगतीत बसवले, यामुळे तो चिडुन उपाशी पोटीच तिथून उठुन निघुन आला. खासगीवाल्यांना हे कळल्यावर त्यांनी लगेच दोन माणसे नारोच्या मागावर पाठवुन त्याला धरुन आणण्यास सांगितलं. त्याला आणल्यावर संतापलेल्या खासगीवाल्यांनी नारोला कडक शब्द सुनावले. त्यामुळे नारोला आपली चुक समजली आणि तो वठणीवर आला. त्याचा गर्व गळुन गेला. नारोने मग खासगीवाल्यांची क्षमा मागितली. खासगीवाल्यांनीही त्याला माफ करुन छत्रपतींच्या दरबारी साताऱ्यास जमाखर्च लिहिण्यासाठी पाठवुन दिले. तिथेही त्याने छत्रपतींची मर्जी संपादन केली. छत्रपतींनी त्याला इंदापुर प्रांताचा मुकादम केले. ‘कामाचे मर्दाने लिहिणारा’ असा नारो आप्पाजींचा लौकीक झाला. १७४७ साली पेशव्यांनी पुन्हा या हुशार माणसाची पुणे दरबारी गरज असल्याचे सांगुन त्याला पुणे दरबारी पाठविण्याची विनंती छत्रपतींना केली. छत्रपतींनी ती विनंती मान्य केली आणि नारो आप्पाजीस पुणे दरबारी पाठविले. पुण्यात आल्यावर नारो आप्पाजीस पेशव्यांनी पुणे सुभ्याची दिवाणगिरीची जवाबदारी सोपविली. त्याचसोबत पेशव्यांच्या कोठी खात्याचे कारभारीपद देखील त्यांस दिले. १७४९ साली खासगीवाल्यांच्या तुळशीबागेची व्यवस्था नारो आप्पाजींवर सोपवली. १७५० साली त्यांची काम करण्याची पद्धत, मुत्सद्दीपणा वगैरे गुण पाहुन नारो आप्पाजीस पेशव्यांनी पुण्याचे सरसुभेदार केले. पुढे पुणे शहराचे मुख्य रचनाकार या नात्याने नानासाहेब पेशव्यांचे स्वप्नातील पुणे शहर निर्माण करण्यात नारो आप्पाजींनी खुप मोलाची मदत केली. यामुळे नारो आप्पाजींनी नानासाहेबांचा अजुनच विश्वास संपादन केला. श्रीमंती वाढली. वेळप्रसंगी अनेक गोष्टी त्याग करून आपल्या पेशव्यांसाठी स्वतःच्या तिजोरीतुन ते पैसा पुरवीत. १७५७ साली नानासाहेबांनी नारो अप्पाजींना पालखीची नेमणुक करून दिली.

१७५८ साली पुण्यात एक रामाचे मंदीर असावे असे नारो आप्पाजींच्या मनीं आले. यासाठी त्यांनी खासगीवाल्यांकडून एक एकरभर पसरलेली तुळशीबाग विकत घेतली. सर्व जागा तुळशी वगैरे काढुन मोकळी केली गेली. त्याला तटबंदी बांधली आणि पेशव्यांकडे राम मंदिर बांधण्याची परवानगी मागितली. नानासाहेबांनी ही मागणी मंजुर केली. माघ महिन्यात या मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. तुळशीबागेचे मालक झाल्यामुळे त्यांना ‘तुळशीबागवाले’ म्हणुन लोक संबोधु लागले आणि त्यांचे खिरे हे आडनाव लोप पावले.

पेशवाईनंतर आले ब्रिटिश आणि अनेक वर्षांनी खाजगीवाल्यांच्या नारळाच्या वाडीचे लॉर्ड रे मार्केट म्हणजेच हल्लीच्या महात्मा फुले मंडईमध्ये रूपांतर झाले. ज्या जागी पूर्वी बागा होत्या तेथे आता व्यापाराची केंद्रे झाली आहेत. मात्र ज्यांना तुळशीबागेत जायचे असते त्यांना या इतिहासाशी काहीच देणे-घेणे नसते. त्यांना रस असतो तो तेथे असणाऱ्या आणि मिळणाऱ्या नानाविध प्रकारच्या वस्तूंमध्ये! तुळशीबागेत काय मिळत नाही, असे विचारले तर इलेक्ट्रॉनिक वस्तू, असे उत्तर देता येईल. आत शिरल्याबरोबर असणारी देवदेवतांच्या मूर्तीची दुकाने, भांडी-कुंडी, संसारास लागणारी बहुतेक सर्व आवश्यक साधनसामग्री देणारी दुकाने, पूजासाहित्य म्हणजे दिवे, समया वगैरे, खरे खोटे दागिने, खेळणी, भेटवस्तू यांची असंख्य दुकाने येथे आहेत आणि गंमत म्हणजे गेली कित्येक वर्षे ही सर्व दुकाने उत्तम चालत आहेत.

तुळशीबागेच्या आत जशी दुकाने आहेत तशी बाहेरच्या बाजूसही आहेतच, त्यात स्वेटर, कपडे, धान्य, किराणा, टिकल्या, नकली दागिने, कलाकुसर करणाऱ्यांसाठी लागणाऱ्या वस्तूंची अनेक दुकाने आहेत. खरे तर तुळशीबाग ही सुमारे एक एकराची चारही बाजूंनी बंद, पैकी तीन बाजूंनी आतून बाहेरून दुकाने, काही देवळे व एक नगारखाना असणारी वास्तू आहे.

उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा असो, त्या त्या ऋतूंसाठी लागणाऱ्या वस्तू इथे असतात आणि त्याच्या ग्राहक महिलाही सदैव खरेदीस तत्पर आणि सिद्ध असतात. बाहेरगावहूनच काय, परदेशातून आलेली महिला कितीही गडबडीत असली तरी तुळशीबागेत चक्कर मारणारच. कारण तुळशीबाग हा महिलांचा हक्काचा प्रांत आहे, तुळशीबाग हा ब्रँड आहे.