कार्तिकी यात्रेला ‘कोरोना’चा फटका; पंढरपुरात संचारबंदी तर वारकऱ्यांसह दिंड्या-पालख्यांना प्रवेश बंदी

0
441

कोरोनाच्या संकटानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं आषाढी पाठोपाठ कार्तिक यात्रेलाही वारकºयांना माऊलीच्या दर्शनाविनाच राहावं लागणार आहे. कोरोना प्रसाराची भीती असल्यानं कार्तिकी यात्रा काळात पंढरपुरात संचारबंदी लागू केली जाणार आहे. त्याचबरोबर चार दिवस बस सेवाही बंद राहणार आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी याविषयीची माहिती दिली.

आषाढीनंतर कार्तिक वारी भरेल आणि त्यामध्ये विठुरायाचे दर्शन करता येईल, असं भाविकांना वाटत होतं. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर दर्शनास सुरू झाले होते. मात्र, आता कार्तिकी वारीच्या काळामध्ये पंढरपूरमध्ये भाविकांना प्रवेश बंदी घालण्यात येणार हे स्पष्ट झालं आहे.

सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. पंढरपूर मध्ये 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचा प्रस्ताव पोलिस विभागाने पाठविला आहे. 22 नोव्हेंबरपासून 26 नोव्हेंबरपर्यंत पंढरपुरामध्ये एसटी वाहतूक बंद असणार आहे. कार्तिकी यात्रेसाठी सतराशे अधिकारी-कर्मचारी होमगार्ड यांचा बंदोबस्त पोलिस विभागाने लावलेला आहे. तिहरी पद्धतीचा बंदोबस्त असणार आहे. कार्तिकी एकादशीचा सोहळा २६ नोव्हेंबर रोजी होत असल्यानं दशमीपासून म्हणजेच २५ नोव्हेंबर रात्री १२ पासून एकादशीच्या रात्री १२ पर्यंत म्हणजेच २६ नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील ५ ते १० किलोमीटरपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक झेंडे यांनी दिली.

ज्या भाविकांनी अथवा दिंड्यांनी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण केलं असेल, त्यांनी परत जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भाविकांना व दिंड्यांना सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरूनच परत पाठविण्यात येणार असल्याचंही झेंडे यांनी सांगितले. कार्तिकी यात्रा काळात कोणत्याही भाविकांनी मंदिरापर्यंत अथवा चंद्रभागेपर्यंत जाऊ नये, यासाठी मंदिर व चंद्रभागा परिसराला तिहेरी बॅरेंगेटिंग केलं जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.