कोरोनाचा फटका: यंदाचा पालखी सोहळा पायी होणार नाही

0
414

राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी एकत्र येणार असलेल्या पंढरीच्या वारीचं काय होणार? यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यावर आता पडदा पडला असून इतिहासात पहिल्यांदाच आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे इतिहासात पहिल्यांदाच देहू आणि आळंदीचा पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. आषाढी वारी बद्दल निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये पुण्याच्या काऊन्सिल हॉलमध्ये बैठक झाली. या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची आणि आळंदी आणि देहुवरून पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या? याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहु आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. यावेळी वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. दरम्यान आळंदी आणि देहुवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, बस किंवा विमानाने पंढरपुरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली आहे.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतना आळंदी देवस्थानचे प्रमुख विकास ढगे यांनी सांगितले की, ज्या मानाच्या सात पालख्या आहेत, त्या पालख्यांमधील संताच्या ज्या पादुका आहेत त्या देव भेटीसाठी पंढरपुरात निश्चित जाणार आहेत. दशमीला त्या पादुका पंढरपुरमध्ये जातील. मात्र त्या कशाप्रकारे जातील तर हे अद्याप निश्चित झालेलं नाही. यंदा पायी वारी होणार नाही, हे निश्चित झालं असून यावर सर्वांचं एकमत झालं आहे. शासनाने देखील त्याबाबतचा निर्णय़ केलेला आहे. फक्त पादुका जात असताना त्या बस, विमान किंवा हेलिकॉप्टर असे तीन पर्याय शासानाने ठेवलेले आहेत.

आजच्या बैठकीत झालेला निर्णय : –

  • वाहन,विमान किंवा हेलिकॉप्टरने जाणार वारी.त्यावेळची पावसाची स्थिती बघून निर्णय घेणार
  • यंदा पायी दिंडी नाही
  • मानाच्या सातही पालख्या पंढरपूरला जाणार,व्यवस्थापन पूर्ण शासन करणार
  • एस टी बस, हेलिकॉप्टरची उपलब्धता सरकार करणार, किती लोक नेणार यावर चर्चा नाही मात्र एक आकडी संख्या असणार
  • भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेणार, परंपरा पाळून उत्सव करणार पण लोकांच्या आरोग्याचीही काळजी घेणार
  • परंपरेप्रमाणे प्रस्थान होईल फक्त पादुका मात्र दशमीला प्रस्थान करणार