Ashadi Ekadashi 2021: आषाढी एकादशीचे महत्त्व

0
223

सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये साधारण 14 एकादशी येतात. पण त्यातही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला खूपच महत्त्व देण्यात येते. या दिवशी खास आषाढी एकादशी शुभेच्छा ही दिल्या जातात. अगदी पुराणापासून आषाढी एकादशी महत्त्वाची मानली जाते. मराठी वर्षानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी. या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक वेगळेच स्थान आणि महत्त्व आहे.

आषाढ महिन्यातील एकादशीला फार पवित्र मानण्यात येते. म्हणून या एकादशीला महाएकादशी म्हणतात. या महिन्यातील अत्यंत आनंदाचा हा दिवस असतो. पांडुरंगाच्या भेटीसाठी कोसच्याकोस पावसा-पाण्यात भिजत-चिंबत जाणार्या वारकरी भक्तांचा दिंडीचा सोहळा अत्यंत मनोरम असा असतो. एक एकादशीस आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामाची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथाची, सासवडहून सोपानदेवाची, पैठणहून एकनाथांची व उत्तर भारतातून कबीराची पालखी निघते. महाराष्ट्रातून तीन लाखांपेक्षा अधिक वारकर्यांची “चंद्रभागे”च्या काठी जत्रा भरते. सर्व जाती-जमातींना भक्तिप्रेमाच्या जोरावर परमेश्वराचा मार्ग मोकळा करून देणारा व परमार्थाच्या प्रांतात लोकशाहीचे रूप विकसित करून देणारा वारकरी संप्रदाय म्हणजे विकसित वैष्णवधर्मच होय.

वारीची परंपरा

वारीची परंपरा ही आठशे वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहे. महाराष्ट्रातील विविध गावांमधून अगदी कानाकोपऱ्यातून लाखो भाविक हे विठ्ठलमनामाचा गजर करत ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आजही जपत आहेत. आषाढ आणि कार्तिक या दोन्ही महिन्यातील शुद्ध एकादशीला ही वारी होते. पण आषाढी एकादशीची वारी ही खूपच मोठी असते. आळंदीमधून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू या स्थळावरून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत म्हणून ओळखले जातात. वारकरी संप्रदायामध्ये लहान-मोठा, श्रीमंत-गरीब हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते असा भाव प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो.

एकादशीच्या दिवशी नित्यनेमाने न चुकता पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी, नित्यनियम म्हणजे वारी. जो नियमित वारी करतो तो वारकरी असे म्हटले जाते. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हटले जाते तर वारकरी धर्मालाच भागवत धर्म असेही म्हटले गेले आहे. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ही एकच इच्छा वारकऱ्याची असते आणि याच इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची ठाम धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानण्यात येते. इतकंच नाही तर अनेक शतकांपासून जागतिक स्तरावरही याचा अभ्यास सुरू आहे. वारीचा हा अनुभव घेण्यासाठी अनेक जागतिक पातळीवरील अभ्यासक, संशोधकही सहभागी होतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेणे ही अत्यंत मनाला शांत करणारी अनुभूती आहे असं म्हटले जाते. जे वारीला जाऊ शकत नाहीत ते उपवास करून आपल्या विठ्ठलाची भक्ती करतात.

आषाढी एकादशीला पंढरपुरला आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूवरून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची तर उत्तर भारतातून कबिराची पालखी एकत्र येते. आषाढीच्या वारीला सुगीची उपमा दिली जाते. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतात आणि मग वारीसाठी निघतात. ते घरी जाईपर्यंत त्यांच्या शेतात जोमाने वाढ झालेली असते आणि हे पिकलेले धान्य शेतकऱ्याला जगण्यास अधिक बळ देतो. याचप्रमाणे वारीच्या दिवशी वारकरी हा प्रेमाची साठवण करून ठेवतो आणि वर्षभर पुढच्या वारीपर्यंत हे विठ्ठलाचे प्रेम व्यवहारात वापरतो असं म्हटलं जातं. तर विठ्ठलाच्या भक्तीसाठी आसुसलेला प्रत्येक जण या वारीत सहभागी होतो असंही सांगण्यात येते.