गणपती बाप्पा निघाले गावाला; यंदा लाडक्या बाप्पांना साधेपणाने निरोप!

0
923

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… असं म्हणत आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण यंदा करोना साथीचे संकट असल्यामुळं गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळं सोशल डिस्टनसिंग आणि शांततेत बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

बाप्पांची दिमाखेदार विसर्जन मिरवणूक पाहायची असेल तर ते फक्त पुण्यातच आणि त्याप्रमाणे अफाट गर्दीही होत असत. पुण्यात ढोल पथकाचा घुमणारा आवाज आणि त्यावर दिल्या जाणाऱ्या घोषणा-गर्जना ह्या सर्व गोष्टी आज सर्व पुणेकर आणि गणेशभक्त आठवत असणार हे नक्की. दरवर्षी वाजत-गाजत विसर्जन मिरवणूक काढून गणरायाला भक्तांकडून निरोप दिला जातो. ढोल-ताशांचा गजर, बँड पथकांचे वादन, सणई चौघड्याचा मंगलमयी सूर, रांगोळीच्या पाउघड्या, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष अशा उत्सहापूर्ण व आनंददायी वातावरणे संपूर्ण शहर बाप्पामय होते. ही वैभवशाली मिरवणूक पाहण्यासाठी लाखो गणेशभक्त विसर्जन मिरवणूक मार्गावर गर्दी करतात. ही मिरवणूक दोन दिवस सुरू असते. पण, कोरोनामुळे मिरवणुकीची ही पंरपरा यंदा खंडित होणार आहे. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व उत्सव शांततेत साजरा करण्यात आले आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणूनच शासन, महापालिका आणि प्रशासनाकडून गर्दी न करता साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन गणेश मंडळांना करण्यात आले होते. या आवाहानाला प्रतिसाद देत गणेश मंडळांनी अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. शासन, पोलीस, महापालिका आणि प्रशासनाच्या सुचनेनुसार उत्सवाचा समारोपही साध्या पद्धतीने करणार असल्याची घोषणा मानाच्या गणपतीसह इतर मंडळांनी केली होती. त्यानुसार आज मंदिर आणि उत्सव मांडवातच लाडक्या बाप्पाला भक्तांकडून निरोप दिला जाणार आहे.

अबाल-वृद्ध सर्वच या कोरोनाचे विघ्न दूर कर अशीच प्रार्थना करत विघ्नहर्त्याला निरोप देत आहेत. पुण्यातील मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन देखील मंदिर परिसरातच विसर्जन हौदात करण्यात येणार असून यंदा शांततेत आणि साध्या पद्धतीने बाप्पाला निरोप देणार आहे.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…!!

यावेळी नाही Dj आणि नाही धांगड धिंगा
फक्त बाप्पा तू आणि मी आपण दोघेच

निरोप देतोय यंदाही पण थोडे चुकल्यासारखे वाटतेय.
पण यावेळी जरा जास्तच भरून आल्यासारखे वाटतंय

यंदा डोळे पाणावलेय जरूर पण तुझे दर्शन घेऊन वेगळीच ऊर्जा संचारली आहे
असाच आशीर्वाद आणि प्रेम राहूदे बाप्पा कारण सर्वांना कोरोनापासून मुक्त पाहायचं आहे…!!!