आषाढी वारीसाठी १७ ते २५ जुलै दरम्यान पंढरपूरात संचारबंदी

0
219

आषाढी वारीला यंदाही भक्तांचा हिरमोड होणार आहे. कारण 17 ते 25 जुलै या काळात म्हणजेच आषाढी वारीसाठी पंढरपुरात  संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू करण्यात येईल त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही या काळात त्रिस्तरीय नाकाबंदी लावण्यात येणार आहे. त्यामुळे परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला या काळात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे यंदाही बहुतेक भाविकांना आषाढी एकादशीला विठ्ठलाचं थेट दर्शन घेता येणार नाही.

२० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. मात्र प्रशासनाने १७ जुलै ते २५ जुलै असे नऊ दिवस पंढरपूरात संचार बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संचारबंदी पंढरपूर आणि आजूबाजूच्या दहा गावात लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता त्या प्रस्तावाला आता शासनाने हिरवा कंदील दिला आहे. पंढरपूरात गेल्यानंतर चंद्रभागेत आंघोळीसाठी भाविकांची मोठी गर्दी असते त्यामुळे चंद्रभागा नदीच्या परिसरात १४४ कलमातंर्गत संचार बंदी लागू करण्यात येणार आहे. ज्या लोकांना शासनाने परवानगी दिली आहे त्याच लोकांना पाच दिवस पंढरपूरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी पंढरपूरात केवळ दोन दिवसांची संचार बंदी लागू करण्यात आली होती. गेल्या वर्षी दशमीला पालखी येऊन द्वादशीला पालख्या गेल्या. त्यामुळे गेल्या वर्षी दोन दिवसांची संचार बंदी लागू करण्यात आली होती. यावेळी मात्र सहा दिवस पालख्या पंढरपूरात राहणार आहेत. त्यामुळे हे सहा दिवस काळजी घेणे गरजेचे असल्याकारणाने संपूर्ण पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या दहा गावात संचार बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.