कसोटी सामन्यामध्ये पहिल्या बॉलवर विकेट घेणार ५ दर्जेदार गोलंदाज

0
263

कोणत्याही खेळाडूसाठी त्याच्या पदार्पणातील सामना हा खास असतो. अनेक वर्ष मेहनत घेतल्यानंतर देशाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळालेली असते. अशा सामन्यात सर्वांच्या नजरेत भरेल अशी कामगिरी केली तर ते पदार्पण अगदी खास ठरते. त्यातही कसोटी सामना म्हणलं की दर्जेदार गोलंदाजी ही आलीच. फलंदाजाला चूक करण्यास भाग पाडण्यावर गोलंदाजांचा कसोटी सामन्यात मुख्य भर असतो. जेवढ्या वेळा फलंदाजाला खेळायला भाग पाडलं जाईल तेवढ्या वेळेस विकेट मिळवण्याची शक्यता वाढते. ग्लेन मॅकग्रा सारख्या गोलंदाजांनी तर आपलं संपूर्ण करियरच चेंडूचा टप्पा आणि लय अत्यंत अचूक ठेऊन घडवलं.

आजपर्यंत ३२ गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट्स घेतली आहे. यावेळी ५ अशा खेळाडूंची माहिती घेणार आहोत ज्यांनी कसोटी सामन्याच्या पहिल्या चेंडूवरच विकेट घेतली. (सर्वात प्रसिद्ध ५ खेळाडू यात घेतलेले आहेत.)


ग्लेन मॅकग्रा हा सार्वकालीन सर्वोत्तम जलदगती गोलंदाजांपैकी एक आहे. मिशेल स्टार्क सारखीच ग्लेन मॅकग्रानेही कसोटी सामन्यात पहिल्या चेंडूवर विकेट गॉल येथेच घेतली पण १९९९ मध्ये.
मॅकग्राने गोलंदाजीची सुरुवात करत पहिलाच चेंडू मिडल आणि ऑफ स्टंपवर गुड लेंथला टाकला. सनथ जयसूर्याने तो चेंडू डिफेंड करायचा प्रयत्न केला पण त्याच्या बॅटची कड घेऊन तो चेंडू मार्क वॉच्या हातात स्थिरावला होता.


मोहम्मद आमिरने पदार्पण केले तेव्हा त्याने आपल्या स्विंग आणि गतीने सर्वांनाच चक्रावून सोडले होते. वयाच्या १७व्या वर्षीच आमिरने कसोटीच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याची किमया साधली.
२००९ मध्ये डंडेन येथे न्यूझीलंडविरुद्ध आमिरने पहिल्याच चेंडूवर स्विंगिंग योर्कर टाकून टीम मॅकींटोशचा त्रिफळा उडवला.


दक्षिण आफ्रिकेच्या केवळ दोनच गोलंदाजांनी कसोटी सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घ्यायची कामगिरी केली आहे. त्यातलाच एक डेल स्टेन.
डेल स्टेनने ही कामगिरी २०१०मध्ये इंग्लंडविरुद्ध जोहान्सबर्गच्या चौथ्या कसोटी सामन्यात केली. इंग्लंडचा कर्णधार अँड्र्यू स्ट्राॅसने पहिला चेंडू खेळायचे ठरवले. पहिलाच चेंडू पायांवर आल्यावर स्ट्रोसने ग्लान्सशॉट खेळला पण तो चेंडू थेट हाशीम आमलाच्या हातात विसावला.


मिशेल स्टार्कने ही कामगिरी २०१६ मध्ये केली. त्याने गॉल येथे श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेला डावाचा पहिलाच चेंडू मिडल आणि लेग स्टंपवर टाकून स्क्वेअर लेगला जो बर्न्सकडे झेल देण्यास भाग पाडले.
याच सामन्यात स्टार्कने पहिल्या डावामध्ये ५ तर दुसऱ्या डावामध्ये ६ विकेट घेऊन एक मोठा टप्पा गाठला.


इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने या यादीमध्ये नुकतीच म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये उडी घेतली. सेंच्युरीयनच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला आधी फलंदाजीसाठी पाचारण केले. ज्यात अँडरसनने पहिल्याच चेंडूवर डीन एल्गरला विकेटकीपर जोस बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले.