कोरोना व्हायरस; आयपीएललाही फटका २९ मार्चऐवजी १५ एप्रिलपासून होणार सुरु

0
647

कोरोना व्हायरस संक्रमणाच्या दृष्टीने अनेक स्पर्धा तसेच अनेक शासकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. आता याच कोरोनाच्या संकटामुळे भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे BCCI कडून स्पष्ट करण्यात आले. नियोजित कार्यक्रमानुसार आयपीएल टुर्नामेंट ही २९ मार्च पासून सुरु होणार होती. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे या स्पर्धेच्या आयोजनावर वादविवाद सुरु होते, अखेर अपेक्षेनुसार आता IPL १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर पडली आहे. आयपीएलच्या सर्व संघमालकांना याबाबत कल्पना देण्यात आल्याची माहितीही BCCI कडून देण्यात आली.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिल्लीत आयपीएल स्पर्धेचे सामने होणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. तर महाराष्ट्रातही कोरोनाच्या भीतीमुळे यात्रा आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाल्याने आयपीएल सामने होणार की नाही याची चर्चा सुरु होती. यासंदर्भात केंद्राने देखील यावर्षी स्पर्धा घेऊ नये असा सल्ला दिला होता आणि स्पर्धा घेणार असाल तर त्या रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय घ्याव्यात असे सरकारचे म्हणणे होते. म्हणूनच सुरक्षेच्या दृष्टीने आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटले आहे.