आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत ८ मार्च म्हणजेच आंतराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी मेलबर्नच्या मैदानात यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमने पहिल्यांदाच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल गाठली आहे. तर ऑस्ट्रेलियन टीमने सलग सहाव्यांदा फायनल गाठली. भारतीय महिलांच्या टीमने साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. त्यामुळे भारतीय संघाचं पारडं जड आहे. या संपूर्ण विश्वचषकामध्ये भारताने एकही सामना गमावलेला नाही आहे. भारताची मदार शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, कर्णधार हरमनप्रीत कौर, राधा यादव, पूनम यादव, यांच्यावर असणार आहे.
जागतिक महिला दिनाच्या दिवशी हि मॅच असल्याने भारतीय महिलांना आपली ताकद दाखविण्याची संधी चालून आली आहे. ही फायनल मॅच पाहण्यासाठी चाहत्यांची माेठी गर्दी असणार आहे. कारण, आतापर्यंत या सामन्यासाठी ८० हजार तिकिटांची विक्री झाली. ९० हजार या स्टेडियमची आसनक्षमता आहे.
शेफाली शर्माला लवकर बाद करा: ब्रेट लीचा ऑस्ट्रेलियन महिलांना संदेश
भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवायचा असेल तर शेफाली वर्माची खेळी महत्त्वाची ठरेल, असा उल्लेखही ब्रेटलीने केला आहे. ऑस्ट्रेलियन महिलांना विक्रमी जेतेपद मिळवायचे असेल तर त्यांनी शेफाली वर्माला लवकरात लवकर बाद करायला हवे, असा सल्लाही ब्रेटलीने दिला आहे. शेफालीचा खेळ पाहून ती १६ वर्षांची आहे असा विश्वासच बसत नाही, असेही त्याने म्हटलंय.