मास्टर ब्लास्टर सचिन साठी आजचा दिवस आहे खास; ८ वर्षांपूर्वी घडवला होता इतिहास

0
370

आजचा दिवस तमाम क्रिकेटप्रेमींसाठी खास आहे. कारण आठ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनं सर्वोच्च इतिहास घडवला होता. १६ मार्च २०१२ हा दिवस भारतीय क्रिकेट प्रेमींच्या मनात कायम राहणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने तसे वनडेत अनेक शतकं केली आहेत पण बरोबर 8 वर्षांपुर्वी शाकिब अल हसनला स्वेअर लेगला फटका मारत एकेरी धाव घेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपले १०० वे शतक साजरे केले. तेव्हा तब्बल १० महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर हा विक्रम झाला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकांचा विक्रम करणारा सचिन एकमेव फलंदाज आहे. त्याच्याआधी या विक्रमापर्यंत पोहोचण्याचा कोणीही विचार देखील केला नव्हता. जे अशक्य वाटत होते ते सचिनने याच दिवशी करून दाखवले.

१६ मार्च २०१२ साली एशिया कपमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने बांग्लादेश संघाविरूद्ध मिरपूर येथे झालेल्या सामन्यात ही शतकी खेळी केली होती.आशिया चषकादरम्यान बांगलादेशविरुद्ध शेर-ए-बांगला मैदानात सचिनने ११४ धावांची खेळी केली. सचिनने त्याचे ९९वे शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२ मार्च २०११ रोजी वर्ल्ड कप स्पर्धेत केले होते. त्यानंतर एक वर्ष चार दिवसांनी सचिन ९९ वरच राहिला. या काळात त्याने इंग्लंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध कसोटी सामने खेळले. या काळात तो अनेक वेळा १००च्या जवळ पोहोचला. पण ९० च्या घरामध्ये सचिन खुपवेळा बाद झाल्याने १००वे शतक काही होत नव्हते. अखेर तो दिवस आलाच जेव्हा मशरफे मुर्तुजाच्या चेंडूवर सचिने १००वी धाव घेतली. बांगलादेशविरुद्ध सचिनचे वनडेमधील हे पहिले शतक होते.

शंभराव्या शतकासोबत १६ मार्च हा दिवस सचिनसाठी आणखी एका कारणामुळे खास आहे. २००५ साली पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात सचिनने आपली दहा हजारावी धाव काढली होती. २०१३ साली सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. त्यानंतर अनेक वर्ष सचिनचे अनेक विक्रम अबाधित आहेत.