टी-२० क्रिकेटमुळे क्रिकेटची परिभाषा बदलून गेली आहे. अवघ्या ३-४ तासात सामना संपत असल्यामुळे तरुण पिढीचा टी-२० क्रिकेटकडे ओढा जास्त असतो. पण कसोटी क्रिकेट हे किती छान होते ते दाखवून दिले सचिन, सेहवाग, द्रविड, गांगुली आणि कुंबळे या खेळाडूंनी. अजूनही कसोटी सामना बघायचा म्हटले की ह्या खेळाडूंची आठवण प्रत्येक क्रिकेटप्रेमीला येतेच. आज मी कसोटी क्रिकेट बद्दल बोलतोय त्याचेही एक कारण आहे बरं का.
आजच्या १४ मार्च या तारखेने भारतीय कसोटी क्रिकेट बऱ्याच अंशी बदलले असे कुणी म्हणत असेल तर त्यावर विश्वास ठेवा. कारण हे खरं आहे. सतरा वर्षं होऊन गेली त्या दिवसाला, त्या टेस्टला, त्या खेळीला, त्या कायच्या काय भागीदारीला.. पण अजूनही ती टेस्ट कायम स्मरणात आहे, कारण अशी टेस्ट त्यापूर्वी झालीच नव्हती. तब्बल १९ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या जोडीने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर विक्रमी भागीदारी रचत कांगारुंना पळता भुई थोडी केली होती. 2001 मध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ईडन गार्डन स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या अनुक्रमे 180, 281 धावांचा डाव आज क्रिकेट प्रेमींच्या लक्षात आहे. जेव्हा पण कसोटी क्रिकेटच्या इतिहासाबद्दल बोलले जाईल तेव्हा लक्ष्मण आणि द्रविडचं नाव पूर्ण सन्मानाने घेतले जाईल.
पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्णधार स्टिव्ह वॉ, मॅथ्यू हेडन आणि जस्टीन लँगर यांच्या धडाकेबाज खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने ४४५ धावांचा पल्ला गाठला. प्रत्युत्तरादाखल भारताची पहिल्या डावात घसरगुंडी उडाली. लक्ष्मणने झळकावलेल्या एकमेव अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २१२ धावांपर्यंत मजल मारली. परिस्थितीचा अंदाज घेऊन ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह वॉने भारताला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात भारताने चांगली सुरुवात केली. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाची परिस्थिती होती, २५४/४ आणि त्यानंतर लक्ष्मण आणि द्रविड यांनी विकेटवर टिकून फलंदाजी करायला सुरुवात केली. लक्ष्मणने 281 आणि द्रविडने 180 धावा करत 376 धावांची भागीदारी केली. भारताने फॉलोऑन डाव 657/7 वर घोषित केला. लक्ष्मणने 631 चेंडूत 44 चौकार ठोकले तर द्रविडने 446 चेंडूत 20 चौकार ठोकले. या १४ मार्च रोजी मॅग्रा, गिलेस्पी, कस्प्रोविझ, वॉर्न पळत राहिले, बॉलिंग टाकत राहिले, फिल्डर्स दमत राहिले. लक्ष्मण-द्रविड जोडीने रचलेला हा इतिहास आजही क्रिकेट प्रेमींच्या मनावर कोरला गेला आहे.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३८४ धावांचं आव्हान देण्यात आलं. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली खरी, मात्र हरभजन सिंहने आपल्या फिरकीच्या जाळ्यात कांगारुंना उडवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हरभजनने दुसऱ्या डावात ६ बळी घेतले. भज्जी व्यतिरिक्त सचिन तेंडुलकरने 3 गडी बाद केले. ऑस्ट्रेलिययाचा दुसरा डाव 68.3 ओव्हरमध्ये 212 धावांवर संपुष्टात आला आणि भारताने कसोटी सामना 171 धावांनी जिंकला. लक्ष्मण आणि द्रविडच्या भागीदारीने असा चमत्कार केला ज्याने भारतीय संघाबद्दल चाहत्यांचा दृष्टीकोन बदलला.