Ind vs Aus : पहिल्या परीक्षेत टीम इंडिया फेल: हार्दिक पांड्या-शिखर धवनची एकाकी झुंज

0
259

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 375 धावांचे विजयासाठी आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 50 षटकात 8 बाद 308 धावाच करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने या सामन्यात 66 धावांनी विजय मिळवला. तसेच 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

शिखर आणि हार्दिक पांड्या भागीदारी करत असताना टीम इंडियाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतू फिरकीपटू झॅम्पाने टीम इंडियाची जमलेली जोडी फोडत ऑस्ट्रेलियाला पुन्हा पुनरागमन करुन दिलं. ७४ धावांची खेळी करत धवन बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतू झॅम्पाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना तो देखील सीमारेषेवर स्टार्ककडे झेल देऊन माघारी परतला. पांड्याने ९० धावांची खेळी केली. यानंतर भारताच्या अखेरच्याा फळीतल्या फलंदाजांनी निराशाच केली. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू झॅम्पाने ४ तर हेजलवूडने ३ तर मिचेल स्टार्कने १ बळी घेतला.

त्याआधी, कर्णधार फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांची धडाकेबाज शतकं आणि त्यांना डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत दिलेली उत्तम साथ या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन-डे सामन्यात ३७४ धावांपर्यंत मजल मारली . आयपीएल गाजवणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. क्षेत्ररक्षणादरम्यान भारतीय खेळाडूंनी केलेल्या गलथान कामगिरीचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला. फिंचने ११४ तर स्मिथने १०५ धावांची खेळी केली.

भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

हार्दिक पांड्याचा अनोखा विक्रम

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ३७५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पंड्याने ९० धावांची झंझावाती खेळी केली. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला आहे.

हार्दिकने ही ९० धावांची खेळी ७६ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह केली. या खेळीदरम्यान त्याने वनडे कारकिर्दीत १००० धावांचा टप्पाही पार केला. हार्दिकने ५५ वनडे सामन्यातील ३९ डावात फलंदाजी करताना ५ अर्धशतकांसह १०४७ धावा केल्या आहेत. त्याने वनडे कारकिर्दीतील ८५७ वा चेंडू खेळताना १००० वी धाव पूर्ण केली.

त्यामुळे तो चेंडूच्या तुलनेत वनडेमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम केदार जाधवच्या नावावर होता. केदारने ९३७ चेंडूत १००० वनडे धावा पूर्ण केल्या होत्या.