Tokyo Olympics 2020: बॉक्सर लव्हलिनाने कांस्यपदक जिंकत रचला इतिहास; कुस्तीत रवि दहिया अंतिम फेरीत

0
340

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत लव्हलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. लव्हलिना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे. सेमिफायनलमध्ये भलेही तिचा पराभव झाला मात्र तिनं देशासाठी पदक जिंकलं आहे.

रवी दहिया अंतिम फेरीमध्ये

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आज चांगलं यश मिळालं आहे. बॉक्सिंगमध्ये लवलीनानं कांस्यपदक मिळवल्यानंतर आता कुस्तीत रवि दहियानं अंतिम फेरी गाठली आहे. रविच्या या विजयानं भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. कझाकिस्तानच्या पैलवानाला सेमीफायनलमध्ये नमवत त्यानं अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरी रविनं विजय मिळवला तर भारताला सुवर्णपदक मिळेल, जर तो तिथं पराभूत झाला तरी रौप्यपदक निश्चित झालं आहे. पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं हे यश मिळवलं आहे.

नीरज चोप्राची जेलवीन थ्रो म्हणजेच भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी

ऑलिम्पिकमधील आजच्या दिवसाची सुरुवात भारतासाठी सकारात्मक ठरली. भारतासाठी स्टार अॅथलीट नीरज चोप्रानं जेलवीन थ्रो म्हणजेच भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. नीरजनं भालाफेकमध्ये अंतिम सामन्यात जागा बनवली आहे. नीरज चोप्रासमोर फायनल्स गाठण्यासाठी 83.5 मीटरचं टार्गेट होतं. परंतु, नीरजनं 86.65 चा थ्रो करत फायनल्समध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. नीरज चोप्राकडून पदकाची अपेक्षा केली जात असून त्यानं क्वालिफाईंग राऊंडमध्येच आपलं लक्ष्य स्पष्ट केलं आहे.

भारतीय महिलांचा अर्जेटिनाकडून सेमीफायनलामध्ये पराभव

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठत इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचा प्रवास अर्जेटिनाने उपांत्य फेरीच्या खिंडीतच रोखला आहे. अंत्यत चुरशीच्या झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने भारताला २-१ असे हरवले. अर्जेंटिनाची कर्णधार मारिओ नोएल बारिनोवोने दोन गोल करत संघाच्या विजयाचा पाया रचला. तर भारताकडून ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने गोल केला.

अंतिम सामन्याचे स्वप्न धूळीस मिळाले असले तरी भारताला कांस्यपदक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. यासाठी त्यांना ग्रेट ब्रिटनला धूळ चारावी लागेल.