बजेट २०२१ :अर्थसंकल्पदरम्यान अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून टीम इंडियाच्या विजयाचा उल्लेख

0
429

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) यांनी आज सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी आपल्या भाषणात सीतारामन यांनी भारतीय क्रिकेट संघाने गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या ऐतिहासिक मालिका विजयाचा उल्लेख केला.

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत २-१ने विजय मिळवला. या विजयाबद्दल सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत. अशातच देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री सीतारामन यांनी देखील भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक केले. भारतीय संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल बोलताना सीतारामन म्हणाल्या, यावरून लक्षात येते की आमच्याकडे किती गुणवत्ता आहे. जे मागच्या क्रमांकावर होते त्यांनी पुढे येऊन कामगिरी बजावली.

अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाची तुलना टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियामधील ऐतिहासिक विजयाशी केली. “आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. टीम इंडियाच्या ऐतिहासिक कसोटी मालिकेप्रमाणेच या अर्थसंकल्पाचे चांगले परिणाम दिसतील. पहिल्या कसोटीत पराभवानंतर भारत पिछाडीवर होता. मात्र यानंतर जोरदार मुसंडी मारत मालिका जिंकली. यावरुन आपण प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडत त्यावर मात करण्यास सक्षम आहोत, हे सिद्ध होतं. टीम इंडियाच्या या विजयामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली”, असं सीतारमण यांनी म्हटलं. अनेक स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर असताना देखील भारताने मिळवलेल्या या विजयाचे कौतुक अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक
“या महिन्यात क्रिकेटमधून गोड बातमी मिळाली. आमच्या क्रिकेट संघाने सुरुवातीच्या अडचणीनंतर शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकली. आमच्या खेळाडूंची मेहनत आणि टीमवर्क ही प्रेरणादायक आहे”,असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतुक केलं. मोदींनी रविवारी (31 जानेवारी) मन की बात या विशेष कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. यावेळेस त्यांनी टीम इंडियाच्या कामगिरीचा उल्लेख केला.