भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आज आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. सौरवने भारतीय संघाचा कर्णधार असताना बऱ्याच मालिका जिंकल्या. खासकरून इंग्लंडविरोधातील नॅटवेस्ट मालिकेत लॉर्डसवरचा ऐतिहासिक विजय सर्वांच्या सर्वांच्या लक्षात राहिला. टीम इंडियाला लढायला आणि जिंकायला शिकवलेला कर्णधार म्हणून माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीची ओळख आहे.
गांगुलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवात वादातच झाली होती. १९९२ मध्ये त्याला संघात स्थान दिले पण जास्त रागीट असल्याचा ठपका ठेवत त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर ठेवण्यात आले. त्यानंतर सहा वर्षांनी दादाला भारतीय संघात इंग्लंड विरुद्ध मालिकेसाठी परत स्थान मिळाले त्यात याने १३१ धावा करत आपले संघातील स्थान निश्चित केले.
कर्णधारपदाची धुरा सांभाळताना संयम असावा लागतो, शांत रहावं लागतं असल्या ज्या काही ठरवल्या गेलेल्या गोष्टी होत्या त्या त्याने ‘ऑन माय फुट’ करत बाजूला केल्या. इथेच त्याने दादागिरी जन्माला घातली. खरं तर त्यानेच भारताला समोरच्या संघाच्या डोळ्यात डोळे घालून सामना खेळायला शिकवलं..
ज्या काळात ऑस्ट्रेलिया संघ सर्व क्रिकेट जगावर अधिराज्य गाजवत होता त्यावेळी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून २००३च्या विश्वचषकात भारत त्यांना अंतिम सामन्यात जाऊन भिडला. तिथे भारत हरला पण आफ्रिकेतून येताना कमालीचा आत्मविश्वास घेऊन आला. त्यावेळी त्याने सर्व भारतीयांना एका गोष्टीची नक्की जाणीव करून दिली कि आपणही विश्वचषक जिंकू शकतो. २०११चा विश्वचषक जिंकण्यात भारतीय संघाचा हा आत्मविश्वास नक्की कामी आला असेल यात शंकाच नाही.
गांगुलीनं प्रामुख्याने 2000 च्या दशकाच्या सुरुवातील टीम इंडियाची धुरा सांभाळली.हा काळ भारतील क्रिकेटसाठी संक्रमणाचा काळ होता. भारतीय संघाचं नेतृत्व घेण्यास कोणी धजावत नव्हतं. संघातील काही खेळाडू फिक्सिंगमध्ये अडकले होते. तेव्हा संघाचे नेतृत्व करत भारतीय क्रिकेटला मार्गावर आणण्याचं काम दादानं केलं. आपल्या आक्रमक स्टाईलने गांगुलीनं संघाला अनेक विजय मिळवून दिले. गांगुलीच्या नेतृत्वात ‘मेन इन ब्लू’ म्हणजे टीम इंडियाने 146 एकदिवसीय सामने खेळले. त्यात 76 सामने जिंकले तर 65 सामने हरले. दादाची एकदिवसीय सामन्यातील विजयाची सरासरी 53.90 इतकी होती. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नेतृत्वात टीम इंडियानं 49 पैकी 21 सामने जिंकले तर 13 सामने हरले तर 15 सामने अनिर्णित राहीले. या काळात विजयाची सरासरी तब्बल 42.85 राहिली.
गांगुलीने कर्णधारपदी असताना आपल्या निर्णयाने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलून टाकला. भारतीय संघ म्हणजे ‘घरके शेर’ हा शिक्का पुसण्यात दादाच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. गांगुलीच्या नेतृत्वात खेळातील अनेक युवा खेळाडूंनी पदार्पण केले. युवराज सिंह, हरभजन सिंह आणि एमएस धोनीसह अनेकांचा या यादीत समावेश आहे. २००२ सालची इंग्लंड विरुध्द नटवेस्ट सिरीज जिंकल्यानंतर गांगुलीने ज्या पद्धतीने शर्ट काडून विजय साजरा केला होता तो क्षण आजही करोडो चाहत्यांच्या स्मरणात आहेे. गांगुली हा दमदार फलंदाजासोबतच उत्कृष्ट कर्णधारही होता. गांगुली हा भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी समजला जातो. त्याने संघाला एकजुटीने खेळायला आणि लढून जिंकायला शिकवलं. गांगुलीच्या नेतृत्त्वात अनेक खेळाडूंनी आपल्या कारकीर्दीचा सर्वोत्तम काळ पाहिला. महेंद्र सिंह धोनीला पहिल्यांदा संधी सौरव गांगुलीनेच दिली होती. त्यावेळचा सर्वात यशस्वी कर्णधार सौरव गांगुली याने भारतीय संघाच्या भविष्यासाठी सर्वात उत्तम कर्णधार तयार करुन दिला
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारताकडून १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. भारताकडून १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारा गांगुली हा आठवा भारतीय खेळाडू आहे. गांगुली भारताकडून ३०० पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळलेला चौथा खेळाडू आहे .भारताच्या क्रिकेट इतिहासात एकदिवसीय सामन्यात सचिननंतर सर्वाधिक धावा गांगुलीच्या नावावर आहेत. त्याने ११३ कसोटी सामन्यात १५शतके आणि ३११ एकदिवसीय सामन्यांतली २२ शतके ठोकली आहेत. एकदिवसीय सामन्यांत १०,००० धावा काढणारा गांगुली जगातील सातवा तर भारतातला दुसरा फलंदाज आहे.
प्रिन्स ऑफ कोलकाता
गांगुलीने स्वत: ला आघाडीचा फलंदाज म्हणून सिद्ध केलं. सौरव गांगुली कर्णधार असताना भारतनं २००३साली वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत धडक दिली. २००३सालच्या वर्ल्डकपमध्ये तीन शतकं करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला होता. त्यानंतर जेफरी बॉयकॉट ने गांगुलीला ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ हे नाव दिलं.
सौरव गांगुली डाव्या हाताने खेळत असला तरी तो डावखूरा नव्हता. भाऊ स्नेहाशीषमुळे गांगुलीला डाव्या हातानं खेळण्याची सवय लागली. स्नेहाशीषमुळे गांगुलीला फुटबॉलमध्येही रस वाटू लागला होता.
असा हा दादा, बंगाली टायगर कोणाला कधी घाबरला नाही कोणाच्या टीकेला एकतर उत्तरच दिले नाही किंवा दिले तर पुन्हा त्या टीकाकाराने कधी टीकाच केली नसेल.दादागिरी जगला तो.. क्रिकेटच्या वातावरणातही आणि बाहेरच्या आयुष्यातही..