टीम इंडियाचा संकटमोचक आणि तारणहार चेतेश्वर पुजाराचा आज वाढदिवस. पुजाराने आपल्या खात्रीशीर फलंदाजीमुळे अनेक वेळा भारतीय संघाला कठीण परस्थितीमधून बाहेर काढलं आहे. नुकतंच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत चेतेश्वर पुजारा एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढला.
वडील आणि काकाही क्रिकेटपटू होते
25 जानेवारी 1988 रोजी गुजरातच्या राजकोटमध्ये जन्मलेल्या चेतेश्वर पुजाराचं कौशल्य पाहून त्याचे वडील अरविंद पुजारा आणि आई रीमा पुजारा यांनी त्याला बालपणापासूनच क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. चेतेश्वर पुजाराचे वडील अरविंद पुजारा सौराष्ट्र संघासाठी रणजी चषकात खेळले आहेत.
द्रविडनंतर बनला टीम इंडियाची भिंत
राहुल द्रविडने 2012 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर चेतेश्वर पुजाराला कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची जबाबदारी मिळाली. त्याने त्या वर्षी न्यूझीलंड संघाविरोधात आपलं नाणं खणखणीत वाजवत आपलं पहिलं कसोटी शतक साजरं केलं. न्यूझीलंडविरोधातील हैदराबाद कसोटीत पुजाराने 159 धावांची शानदार खेळी रचली होती.
- पुजाराने आतापर्यंत 81 कसोटी सामन्यात 47.74 च्या सरासरीने 6111 धावा केल्या आहेत. त्याने इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबादमधील सामन्यात कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम 206 धावांची खेळी रचली होती. कसोटी क्रिकेटमध्ये पुजाराच्या नावावर 18 शतक आणि 28 अर्धशतकं जमा आहेत. कसोटी कारकीर्दीत चेतेश्वर पुजाराने 3 दुहेरी शतकं केली आहेत.
- सुरुवातीला पुजाराने अष्टपैलू खेळाडू म्हणून क्रिकेटची सुरुवात केली होती. पण नंतर भारताचे माजी क्रिकेटपटू केरसन घावरी यांनी त्याच्या वडिलांना पुजाराने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे असे सांगितले.
- पुजारा 10 वर्षांचा असताना त्याचे वडील त्याला उन्हाळ्यात मुंबईला घेऊन आले. त्यावेळी त्यांना काही खडतर परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी तो एका आठड्यात तीन सामने आणि महिन्यात 12 सामने खेळायचा.
- 2001 मध्ये 12 वर्षांचा असताना पुजाराने 14 वर्षांखालील सौराष्ट्र संघाकडून खेळताना बडोदा विरुद्ध 306 धावांची खेळी केली होती. ही खेळी पुढील कारकिर्दीसाठी महत्त्वाची ठरली, असे पुजारा म्हणतो.
- युवा क्रिकेट गाजवत असताना पुजाराला 2005 मध्ये त्याच्या आईचे कर्करोगाने निधन झाल्याने मोठा धक्का बसला. त्याची आई म्हणाली होती तो जेव्हा भारतीय संघात सामील होईल, त्यानंतर त्याला थांबवणे कठीण आहे.
- 2006 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळताना पुजारा स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 6 डावात 117 च्या सरासरीने 349 धावा केल्या होत्या. मात्र त्यावेळी भारताला अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध पराभूत व्हावे लागले होते.
- पुजाराला 2010 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात पहिल्यांदा जागा मिळाली होती. त्याला या दौऱ्यात दुसऱ्या कसोटी सामन्यात अंतिम 11 जणांच्या संघात दुखापतग्रस्त गौतम गंभीरच्या ऐवजी जागा मिळाली होती. या सामन्यात त्याने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 74 धावा केल्या होत्या.
- 2013 मध्ये आयसीसीकडून पुजाराला उदयोन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला होता.
- पुजाराने आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
- -पुजारा कौउंटी क्रिकेटमध्ये डर्बिशायर संघाकडूनही क्रिकेट खेळला आहे.
कसोटीत वेगाने १ हजार धावा करणारा दुसरा भारतीय
>> एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारा भारतीय (५११)
>> सर्व कसोटीत पाचव्या दिवशी फलंदाज करणारा तिसरा तर जगातील नववा फलंदाज
>> ऑस्ट्रेलियात २०१८-१९ आणि २०२०-२०२१ च्या ऐतिहासीक विजयातील सदस्य