हॅपी बर्थडे द वॉल: भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ राहुल द्रविड बर्थ डे स्पेशल

0
384

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सचिनचे विक्रम आणि एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता यामुळे सचिनला ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हटले जाते. पण जेव्हा देव अपयशी ठरायचा तेव्हा मदतीला येत होती ‘द वॉल’! भारतीय संघात द वॉल अशी ओळख असलेल्या राहुल द्रवीडचा (Rahul Dravid) आज वाढदिवस आहे. वनडे आणि कसोटीमधील भारतीय संघातील क्रमांक तीनचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून राहुल द्रवीडची ओळख.

11 जानेवारीस 1973 ला जन्मलेल्या राहुल द्रविडने आपल्या शानदार डिफेन्सच्या बळावर ‘दिवार’ ही उपाधी मिळवली. 20 जून, 1996 ला क्रिकेटचा मक्का समजला जाणाऱ्या इंग्लंडमधील प्रसिद्ध लॉर्डस मैदानावरून राहुल द्रविड याने आपल्या कसोटी कारकीर्दीला सुरुवात केली. द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीमध्ये 24 हजार धावांचा पाऊस पाडला. फलंदाजासह स्लिपमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही त्याच्या नावाच डंका कायम गाजत राहिला. द्रविडच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक झेल पकडण्याचाही विक्रम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर द्रविड सध्या हिंदुस्थानी क्रिकेटची नवीन फळी उभारण्याचे काम करत आहे.

आपल्या 16 वर्षाच्या मोठ्या क्रिकेट कारकिर्दीत राहुलने मैदानावरील प्रभावी कामगिरी, नम्र आणि मोहक व्यक्तिमत्त्वाने जगभरातील चाहत्यांचे मन जिंकले आहेत. द्रविड अत्यंत शांत पण गंभीर स्वभावाचा खेळाडू आहे. मैदानावर कशीही स्थिती कसो राहुल नेहमीच आपल्या शांत पण आक्रमक अंदाजात खेळताना दिसला आहे. तुम्ही कदाचितच द्रविडला कोणत्याही वादात अडकलेले पहिले असेल. राहुल हा एकमेव खेळाडू आहे जो पदार्पणाच्या टी-20 सामन्यातच निवृत्त झाला.

कसोटी आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 10,000 हून अधिक धावा केल्या. 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याने 164 कसोटी सामन्यात 52.31 च्या सरासरीने 13288 धावा केल्या. त्याने 344 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 39.16 च्या सरासरीने 10889 धावा केल्या. त्याने आंतरराष्ट्रीय टी -20 सामनाही खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 48 शतके केली आहेत.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 पेक्षा जास्त धावांची भागीदारी करणारा राहुल द्रविड जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याने 1999 च्या विश्वचषकात 26 मे रोजी टॅनटॉन येथे श्रीलंकेविरूद्ध सौरव गांगुलीबरोबर दुसर्‍या विकेटसाठी 318 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर राहुल द्रविडने 8 नोव्हेंबर 1999 रोजी हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या विकेटसाठी सचिन तेंडुलकरबरोबर 331 धावांची भागीदारी केली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 पेक्षा जास्त धावांच्या केवळ पाच भागीदाऱ्या आहेत.

राहुल द्रविडचे खास रेकॉर्ड

  • राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडूंचा सामना केला. 286 कसोटींमध्ये त्याने 31 हजार 258 चेंडू खेळले. यामध्ये त्याने 13 हजार 288 धावा केल्या.
  • कसोटीमध्ये सर्वाधिक 210 झेल पकडण्याचा विक्रमही द्रविडच्या नावावर आहे. विकेटकीपरशिवाय कोणत्याही खेळाडूने झेललेले सर्वाधिक कॅच आहेत.
  • परदेशी खेळपट्ट्यांवरील सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून राहुल द्रविडचा विक्रम आहे. 20 जून 1996 रोजी इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानातून त्याने कसोटी पदार्पणात 95 धावा केल्या.
  • सलग चार कसोटींमध्ये सलग चार शतकं ठोकण्याचा विक्रम द्रविडच्या नावे आहे. इंग्लंडविरुद्ध त्याने 115,148 आणि 201 धावा केल्या होत्या. मग वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने शतक झळकावून सलग चार कसोटीत सलग चार शतकं झळकावण्याचा पराक्रम केला.
  • द्रविड केवळ कसोटी फलंदाज नव्हता, तर वन डेचं मैदानही त्याने गाजवलं. 1999 च्या वर्ल्डकपमध्ये द्रविडने सर्वाधिक 461 धावा केल्या होत्या.
  • वर्ल्डकप सामन्यांमध्ये द्रविड जगातील सर्वोत्तम फलंदाज ठरला. द्रविडची सरासरी 61.42 इतकी होती.
  • ज्यावेळी भारतीय संघाला चांगला विकेटकीपर मिळत नव्हता, त्यावेळी द्रविडने स्वत: ग्लोव्ज घालून, संपूर्ण वर्ल्डकपमध्ये विकेटकीपिंग केली. उत्तम विकेटकीपर म्हणून त्याने लौकीक मिळवला.
  • द्रविडने विकेटकीपर म्हणून 73 वन डे सामन्यात 2300 धावा केल्या, ज्या धोनीनंतर सर्वाधिक धावा आहेत.

जाणून घेऊया द्रविडच्या शानदार कारकीर्दीबाबत…

  1. क्रिकेटमध्ये कारकीर्द सुरू करण्यापूर्वी राहुल द्रविड हिंदुस्थानचा राष्ट्रीय खेळ हॉकी खेळायचा हे अनेक लोकांना माहिती नाही. शाळेच्या दिवसांमध्ये द्रविड ज्यूनिअर हॉकी स्टेट संघाकडून खेळायचा.
  2. राहुल द्रविड असा एकमेव खेळाडू आहे ज्याने आपल्या पदार्पणाच्या लढतीतच निवृत्ती घेतली. द्रविडने आपला पहिला आणि अंतिम टी-20 सामना इंग्लंडविरुद्ध 31 ऑगस्ट, 2011 ला खेळला. या लढतीत द्रविडने 21 चेंडूत 31 धावांची खेळी केली होती.
  3. राहुल द्रविडचे वडील एक जाम बनवणाऱ्या कंपनीमध्ये काम करत होते, त्यामुळे राहुल द्रविडचे टोपन नाव ‘जॅमी’ असे पडले. राहुलच्या टोपन नावावरून बंगळुरूमध्ये एक स्थानिक स्पर्धाही आयोजित केली जाते. जॅमी कप नावाने होणाऱ्या या स्पर्धेत ‘मॅन ऑफ द मॅच’ ऐवजी ‘जॅमी ऑफ द मॅच’ हा किताब देण्यात येतो.
  4. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये एकून 31258 चेंडूंचा सामना केला आहे. द्रविडने आपल्या कारकीर्दीत एकून 164 कसोटी लढतींपैकी 163 कसोटी लढती टीम इंडियाकडून खेळल्या. एक कसोटी सामना त्याने आयसीसी विश्व इलेव्हन संघासाठी खेळला होता आणि यात त्याने शून्य व 23 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाच्या 2011-12 दौऱ्यानंतर 9 मार्च 2012 रोजी द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर, राहुल द्रविडने आपल्या अनुभवाचा उपयोग देशातील युवा क्रिकेटपटूंचे मार्गदर्शन केले. त्याने अंडर-19 संघाला प्रशिक्षण दिले ज्याचा फायदा संघाला झाला आणि भारताने 2018 वर्ल्ड कप विजेतेपद पटकावले. द्रविड 2020 पर्यंत संघाच्या प्रशिक्षकपदी कायम होते. द्रवीडच्या मार्गदर्शनाखालीच पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, ऋषभ पंत, मनीष पांडे, शुभमन गिल हे खेळडू तयार झाले आहेत आणि सध्या भारताच्या मुख्य संघाकडून खेळत आहेत. सध्या द्रवीड बेंगळूरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे.

द वॉल म्हणजेच भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ म्हणून ख्याती असलेल्या राहुल द्रविड सरांना देसी डोकं टीमकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!