स्विंगमुळं फलंदाजांची झोप उडवणारा आणि अनेक सामना जिंकून देणाऱ्या झहीर खानचा वाढदिवस

0
374

एकेकाळी आपल्या स्विंगमुळं फलंदाजांची झोप उडवणारा आणि भारताला अनेक सामना जिंकून देणाऱ्या दिग्गज खेळाडूचा आज वाढदिवस आहे.या खेळाडूची कहानी एखाद्या सिनेमासारखी आहे. आज भारताच्या स्विंग मास्टर आणि दिग्गज क्रिकेटपटूचा वाढदिवस आहे.या खेळाडूचं नाव आहे झहीर खान. सहा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सध्या झहीर आयपीएलबरोबरच समालोचक, क्रिकेट तज्ज्ञ म्हणून काम करतो. सध्या झहीर खान मुंबई इंडियन्सच्या मार्गदर्शकाची भूमिका निभावत आहे.

महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये 7 ऑक्टोबर 1978 रोजी जन्मलेल्या झहीर खानने, भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं. 2000मध्ये केनिया विरोधात झालेल्या सामन्यात झहीरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जहीरनं भारतासाठी 610 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात 311 कसोटी, 282 एकदिवसीय आणि 17 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. २००३ च्या विश्वचषकामध्ये त्याने ११ सामन्यात १८ विकेट्स घेतल्या तर २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रभावी गोलंदाजी करताना १० षटकांपैकी 3 निर्धाव षटके टाकली आणि २ विकेट्सही घेतल्या. या विश्वचषकात तो शाहिद आफ्रिदीसह सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरला. त्याने ९ सामन्यात २१ विकेट्स घेतल्या.

झहिरने २००४ ला बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत ७५ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्या ११ व्या क्रमांकाच्या खेळाडूने केलेल्या सर्वोच्च धावा होत्या. हा विक्रम नंतर वेस्ट इंडीजच्या टीनो बेस्ट आणि ऑस्ट्रेलियाच्या ऍश्टोन एगारने मोडला. त्यावेळी झहिरने सचिन तेंडूलकरबरोबर १० व्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारीही केली होती.

२००८ मध्ये त्याला ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हल्ली क्रिकेटमध्ये वापरण्यात आलेला ‘नकल बॉल’ हे झहीरचे अस्त्र आहे. २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेत त्याने ‘नकल बॉल’चा वापर केला होता. भारतासाठी झहीरने ९२ कसोटी सामने खेळताना ३११ बळी घेतले. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २८२ बळी टिपले आहेत. भारताला २००३ मध्ये उपविजेता आणि २०११ मध्ये विश्वविजेता बनवण्यामध्ये झहीरचा सिंहाचा वाटा आहे. झहीरने १५ ऑक्टोबर २०१५ ला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

भारतासाठी सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत झहीरचा चौथा क्रमांक लागतो. झहीरने त्याच्या कारकिर्दीत आयपीएलमध्ये तीन संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स(दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळला आहे.