ICC Women’s World Cup : भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय; स्मृती मानधना, हरमनप्रीत कौरची चमकदार कामगिरी

0
241

एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना चांगलाच रंगला. हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्यात भारताने इंडिजला धूळ चारली असून तब्बल १५५ धावांनी विजय नोंदवला आहे. भारताने वेस्ट इंडिजसमोर ३१७ धावांचे तगडे आव्हान उभे केले होते. हे लक्ष्य गाठत असताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १६२ धावांवर गारद झाला. या सामन्यात स्नेह राणानं सगळ्यात जास्त 3 आणि मेघना सिंहनं 2 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. तिन सामन्यात भारतीय संघाचा हा दुसरा धडाकेबाज विजय आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकत भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून स्मृती मानधना आणि यस्तीका भाटिया सलामी देण्यासाठी मैदानात उतरल्या. मात्र, या सामन्यातील सहाव्या षटकात यस्तीका भाटीया (31 धावा) बाद झाली. त्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार मिताली राजलाही काही खास कामगिरी करता आली नाही. तिनं नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर 5 धावांवर असताना आपली विकेट्स गमावली. मिताली पाठोपाठ दिप्ती शर्माही स्वस्तात माघारी परतली. तिला या सामन्यात केवळ 15 धावा करता आल्या. दरम्यान, एकाबाजूनं संयमी खेळी करणाऱ्या स्मृती मानधनाला हरमनप्रीत कौरची साथ मिळाली. या दोघांनी तडफदार शतक ठोकून भारताचा स्कोर 300 पार पोहचला. भारतानं 50 षटकात 8 विकेट्स गमावून 317 धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून अनिसा मोहम्मदनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, हेली मॅथ्यूज, शकेरा सेलमॅन, डॉटीन आणि आलिया अॅलीनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे.

एकाच सामन्यात दोन शतके
हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या शतकांमुळे न्यूझीलंडमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या शतकांचा विक्रमही मोडला. 1982 पासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताने न्यूझीलंडमध्ये केवळ एकच शतक झळकावले होते. पण आता एकाच सामन्यात दोन शतके झाली आहेत. त्याचवेळी स्मृती मानधनाने वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सलग दुसरे शतक झळकावले. 2017 च्या विश्वचषकातही त्याने याच संघाविरुद्ध शतक झळकावले होते.

स्मृती मंधानाचे हे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाचवे शतक आहे, तर हरमनप्रीत कौरचे हे चौथे शतक आहे. २०१७ च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावल्यानंतर हरमनप्रीत कौरची ही पहिली शतकी खेळी आहे.

या धावसंख्येचा पाठलाग करताना इंडिजच्या खेळाडूंची चांगलीच दमछाक झाली. वेस्ट इंडिजची दियांद्रा डॉटिन (६२) वगळता एकही खेळाडूने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे इंडिजचा संघ अवघ्या १६२ धावांवर बाद झाला. डॉटिन आणि मॅथ्यूज यांनी सुरुवातीला मैदानावर चांगले पाय रोवले होते. त्यानंतर मात्र इंडिजची कोणतीही जोडी खेळपट्टीवर तग धरू शकली नाही. त्यामुळे भारताचा १५५ धावांच्या फरकाने विजय झाला.

विश्वचषकात प्रथमच भारतीय महिला संघाच्या ३०० पेक्षा जास्त धावा

एकदिवसीय विश्वचषकात भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधीची सर्वोच्च धावसंख्या ५० षटकात ६ बाद २८४ होती, जी ३१ जानेवारी २०१३ रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच केली होती. विशेष म्हणजे तेव्हाही भारतीय संघाचं नेतृत्व मिताली राजच्याच हाती होतं. भारताने हा सामना १०५ धावांनी जिंकला होता.