भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिका: नवे प्रशिक्षक व नव्या कर्णधारासह भारतीय संघाची पहिली मालिका

0
272

भारत व न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० सामना बुधवारी सायंकाळी ७ वाजेपासून खेळवला जाईल. न्यूझीलंड संघ चार वर्षांनी भारताच्या दौऱ्यावर आला. दोन्ही संघ १६ दिवसांनंतर पुन्हा एकदा टी-२० मध्ये समोरासमोर असतील. ३१ ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडने भारताला ८ गड्यांनी मात दिली होती. भारतीय संघाची न्यूझीलंड विरुद्ध कामगिरी अतिशय खराब राहिली आहे. गत वर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर संघाने ३ एकदिवसीय सामने गमावले होते. त्यानंतर दोन कसोटी आणि पुन्हा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताला यंदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. कोहलीने स्पर्धेपूर्वीच ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यातच रवी शास्त्री यांचाही मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. अशा स्थितीत पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी नव्याने संघबांधणी करण्याची भारताला संधी आहे. त्यामुळे ‘आयपीएल’मध्ये आपल्या कल्पक नेतृत्वाने मुंबई इंडियन्सला पाच वेळा जेतेपदाचा किताब मिळवून देणारा रोहित आणि युवा खेळाडूंना पैलू पाडण्यात पटाईत असलेला द्रविड यांची जोडी भारतासाठीही मोलाचे योगदान देईल, अशी तमाम चाहत्यांना अपेक्षा आहे.

नवे प्रशिक्षक व नव्या कर्णधारासह भारतीय संघाची पहिली मालिका
बुधवारपासून भारतीय क्रिकेटच्या नव्या युगाला सुरुवात होईल. नवे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि नवा टी-२० कर्णधार रोहित शर्मासोबत भारतीय संघाची पहिली टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका असेल. जयपूरच्या सवाई मानसिंग (एसएमएस) स्टेडियम क्रिकेटची नवी पटकथा लिहिण्यास तयार आहे. या मैदानावरील हा पहिला टी-२० सामना असेल. कोरोनानंतर प्रथमच १०० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत देशातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना होईल.

युवा फळीकडे लक्ष

कोहली, शिखर धवन यांसारख्या प्रमुख फलंदाजांच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर या युवा फळीच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल. रोहितच्या साथीने महाराष्ट्राचा ऋतुराज सलामीला येण्याची शक्यता असून मुंबईकर सूर्यकुमार यादवचे मधल्या फळीतील स्थान पक्के मानले जात आहे.

हार्दिकच्या पर्यायाचा शोध

अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला सुमार कामगिरीमुळे या मालिकेतून वगळण्यात आल्यामुळे त्याच्याऐवजी वेंकटेश अय्यरला छाप पाडण्याची संधी आहे. भुवनेश्वर कुमार भारताच्या गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करेल. रविचंद्रन अश्विन फिरकीची धुरा वाहील.