Road Safety World Series : सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली इंडिया लिजेंडला पहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे विजेतेपद

0
243

दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज (road safety world series )च्या अंतिम सामन्यात इंडिया लेजेंड्स (India legends)ने श्रीलंका लेजेंड्स (Sri lanka legends)चा १४ धावांनी पराभव केला आणि विजेतेपद मिळवले. भारताने प्रथम फलंदाजी करत १८१ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल श्रीलंकेला १६७ धावा करता आल्या. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे जेतेपद मिळवले. अष्टपैलू कामगिरी करणारा युसूफ पठाण अंतिम सामन्याचा मानकरी ठरला. नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरूवात विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी केली. या दोघांकडून मोठ्या भागिदारीची अपेक्षा होती. पण सेहवाग १० धावा करून माघारी परतला. त्यानंतर लंकेच्या सनथ जयसूर्याने बद्रीनाथची विकेट घेत भारताला दुसरा धक्का दिला. सचिन तेंडुलकर ३० धावा करून बाद झाल्यानंतर यानंतर युवराज सिंग आणि युसूफ पठाणने जोरदार फटकेबाजी केली. युवराजने 41 बॉलमध्ये 60 रन आणि युसूफ पठाणने 36 बॉलमध्ये नाबाद 62 रन केले. युवराजने 4 फोर आणि 4 सिक्स तर युसूफ पठाणने 5 सिक्स आणि 4 फोर मारले. श्रीलंकेकडून हेराथ, जयसूर्या, महरूफ आणि वीररत्नेला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाल्या.

विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने चांगली सुरूवात केली. एका टप्प्यावर श्रीलंका सामन्यात आघाडीवर होता.तिलकरत्ने आणि जयसूर्या यांनी पहिल्या विकेटसाठी ६ २ धावा जोडल्या. युसूफने तिलकरत्नेला २१ वर बाद केले. त्यानंतर इरफानने लंकेला दुसरा धक्का दिला. ८३ धावसंख्येवर इरफानने जयसूर्यला ४३ धावांवर बाद करत मोठी विकेट मिळवली. श्रीलंकेच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत लढत दिली. त्यांना १२ चेंडूत ३० धावा हव्या होत्या. अखेरच्या षटकात २४ धावांची गरज असताना त्यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. पण मुनाफ पटेलने शानदार गोलंदाजी करत १४ धावांनी विजय मिळून दिला. भारताकडून पठाण बंधूंनी प्रत्येकी २ विकेट तर गोनी आणि पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मागच्या वर्षी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती, पण कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा अर्ध्यातच रद्द करण्यात आली. यावर्षी इंडिया लिजेंड्स, श्रीलंका लिजेंड्स, दक्षिण आफ्रिका लिजेंड्स, बांगलादेश लिजेंड्स, वेस्ट इंडिज लिजेंड्स आणि इंग्लंड लिजेंड्स या टीम सहभागी झाल्या होत्या.

सामाजिक संदेशाचा हेतूने आयोजित केली गेली होती स्पर्धा
जगभरातील नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. या स्पर्धेमध्ये सहा देशांच्या निवृत्त क्रिकेटपटूंनी भाग घेतला होता. भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर हे या स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर आहेत.